परवानगीविना गौण खनिजाची वाहतूक; प्रशासनाकडून कारवाईचा इशारा
अमळनेर | प्रतिनिधी : शहरातील गौण खनिजाच्या अनधिकृत वाहतुकीवर महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रांताधिकारी मयुर भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने भगवा चौक परिसरात परवानगीविना मुरूमाची वाहतूक करणारा डंपर ताब्यात घेतला. पुढील कार्यवाहीसाठी हा डंपर अमळनेर तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे.
भगवा चौक परिसरात महसूल विभागाचे पथक नियमित तपासणी करत असताना संशयास्पदरीत्या मुरूम वाहतूक करणारा डंपर आढळून आला. वाहनाची पाहणी केल्यानंतर गौण खनिजाची वाहतूक अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पथकाने विलंब न करता वाहन ताब्यात घेतले.
या मोहिमेत नायब तहसीलदार सी. यू. पाटील, मंडळ अधिकारी पी. एस. पाटील (वावडे भाग), ग्राम महसूल अधिकारी संदीप माळी (मांडळ), बिक्रम कदम (शहापूर), अमोल पाटील (कुरे खुर्द), विकेश भोई (बाम्हणे) तसेच एम. आर. पाटील (जैतपीर) यांनी सहभाग नोंदविला.
गौण खनिजाच्या अवैध उत्खननासह विनापरवाना वाहतुकीला प्रतिबंध करण्यासाठी महसूल प्रशासनाकडून तपासणी तीव्र करण्यात आली आहे. महसुलाचे नुकसान करणाऱ्या तसेच नियमबाह्य पद्धतीने गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

