सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका; जळगाव जिल्ह्यात प्रवेशास सहा महिन्यांची मनाई…
अमळनेर | प्रतिनिधी : सण-उत्सवांच्या काळात शहरातील शांतता अबाधित राहावी आणि कायदा-सुव्यवस्थेला गालबोट लागू नये, यासाठी अमळनेर पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईला वेग दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शाह आलम नगर येथील इम्रान शेख सलीम याच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली असून, त्याला पुढील सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्याबाहेर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
इम्रान शेख याच्याविरुद्ध तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ईदच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेत त्याचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या कारवाईत नमूद करण्यात आले आहे. त्याच्या वर्तणुकीमुळे परिसरातील सामाजिक शांतता आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी मांडला होता.
याप्रकरणी पोलिस विभागाकडून सुरुवातीला इम्रान शेख याला जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावावर उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांच्यासमोर सुनावणी झाली. संबंधित पक्षांचे म्हणणे तसेच गोपनीय साक्षीदारांकडून मिळालेली माहिती तपासल्यानंतर महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ मधील कलम ५६ (अ)(ब) नुसार सहा महिन्यांची हद्दपारी निश्चित करण्यात आली.
दरम्यान, आगामी ईद, रक्षाबंधन, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुक्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींची पोलिसांकडून माहिती संकलित केली जात आहे. दादागिरी, गुंडगिरी किंवा दहशतीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांविरोधात हद्दपारीसह अन्य प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव तयार केले जात आहेत.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्याकडून गुन्हेगारांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.

