श्रीकृष्ण ज्ञान मंदिर सभामंडपासाठी २० लाख, कूर्हेसीम तांडा रस्त्यासाठी १० लाखांची तरतूद…
अमळनेर | प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील मौजे खेड़ी व्यव्हारदळे येथे विविध विकासकामांसाठी तब्बल ३० लाख रुपयांच्या निधीतून कामांना सोमवारी (दि. १७ ऑगस्ट) प्रारंभ करण्यात आला. श्रीकृष्ण ज्ञान मंदिर सभामंडप बांधकामासाठी २० लाख रुपये, तर कूर्हेसीम तांडा रस्ता काँक्रीटीकरणासाठी १० लाख रुपये मंजूर असून, या कामांचे भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन माजी मंत्री व अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शुभहस्ते झाला.
गावातील विकासकामांसाठी सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन व व्हाईस चेअरमन, पोलीस पाटील, ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण मंडळींनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी सौ. जयश्रीताई अनिल पाटील, मार्केट सभापती, उपसभापती, शेतकी संघाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व सदस्य तसेच परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
सभामंडपाच्या बांधकामामुळे गावातील धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. तर कूर्हेसीम तांडा रस्त्याचे काँक्रीटीकरण झाल्याने दळणवळण अधिक सुलभ होऊन ग्रामस्थांच्या वाहतुकीची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. या दोन्ही कामांमुळे गावाच्या विकासाला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना भाऊ पाटील व भगवान शेंनपडू पाटील यांनी केले. उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी विकासकामांना शुभेच्छा देत समाधान व्यक्त केले.

