मुडीच्या जितेंद्र सूर्यवंशी यांना ‘विशिष्ट सेवा पदक’; मुंबई एटीएसमधील उल्लेखनीय कर्तव्याची केंद्र सरकारकडून दखल…
अमळनेर | प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील मुडी गावचे सुपुत्र तथा मुंबई दहशतवादविरोधी पथकातील (एटीएस) कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी जितेंद्र धर्मराज सूर्यवंशी यांना भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारच्या केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे ‘विशिष्ट सेवा पदका’ने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, उल्लेखनीय कामगिरी आणि पोलीस सेवेत बजावलेल्या उत्कृष्ट भूमिकेची दखल घेत हा मानाचा बहुमान प्रदान करण्यात आला.
जितेंद्र सूर्यवंशी यांनी पोलीस सेवेत आपल्या कर्तव्याप्रती निष्ठा, शिस्त आणि समर्पणाची प्रचिती देत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. विशेषतः मुंबई एटीएसच्या पथकात कार्यरत असताना त्यांनी बजावलेल्या जबाबदारीची दखल केंद्रीय गृह मंत्रालयाने घेत त्यांना ‘विशिष्ट सेवा पदका’ने सन्मानित केले.
केंद्र सरकारकडून मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या सन्मानामुळे मुडी गावासह संपूर्ण अमळनेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तसेच मुंबई एटीएसच्या कार्यक्षमतेलाही या गौरवामुळे अधोरेखित मान्यता मिळाली आहे.
जितेंद्र सूर्यवंशी यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मित्रपरिवार, नातेवाईक, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सामान्य कुटुंबातून पुढे येत पोलीस सेवेत आपल्या कर्तृत्वाची अमिट छाप उमटविणाऱ्या सूर्यवंशी यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
त्यांच्या या गौरवास्पद कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, आगामी सेवावाटचालीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

