प्रतिनिधी | अमळनेर : नगरसेवक भरत शेठ लालवणी यांच्या हॉटेल पायलच्या गोडावूनला सोमवारी सकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच अमळनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या समयसूचक कारवाईमुळे शेजारील गोडावूनना आगीची झळ पोहोचली नाही आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला.
मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या आदेशानुसार अग्निशमन प्रमुख गणेश गोसावी यांच्या नेतृत्वाखाली दिनेश बिऱ्हाडे, फारुख शेख, मच्छिंद्र चौधरी, भिका संदनशिव आणि वसीम पठाण यांनी घटनास्थळी पोहोचून शर्थीचे प्रयत्न सुरू केले. जवानांनी अथक परिश्रम घेत आग नियंत्रणात आणत तिचा पुढील परिसरात होणारा संभाव्य फैलाव रोखला.
गोडावून परिसरात इतरही गोडावून असल्याने आग भडकण्याची शक्यता होती. मात्र अग्निशमन दलाच्या तत्पर हस्तक्षेपामुळे आग पसरण्यापूर्वीच नियंत्रणात आली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगण्यात आले.
आगीचे नेमके कारण तसेच झालेल्या नुकसानीचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. घटनेबाबत पुढील तपास सुरू आहे.

