अग्निशमन दलाच्या समयसूचकतेने संकट टळले; विजय मारुती मंदिरासमोर रात्री ८.०७ वाजता घडली घटना…
अमळनेर | प्रतिनिधी : शहरातील विजय मारुती मंदिरासमोर आज रात्री सुमारे ८.०७ वाजता सिमेंट वाहतूक करणाऱ्या मोठ्या ट्रॉलीला अचानक आग लागल्याची घटना घडली. वाहन क्रमांक NL 01 AH 2515 असलेल्या, ट्रॉलीच्या टायरचा लाइनर चिपकल्याने घर्षणातून आग भडकली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली आणि अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविले. अग्निशमन दलाच्या समयसूचक हस्तक्षेपामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.

सदर वाहन एल अँड टी सिमेंटचे साहित्य घेऊन धुळे येथून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने मार्गस्थ झाले होते. प्रवासादरम्यान विजय मारुती मंदिरासमोर टायरचा लाइनर चिपकल्याने अचानक ठिणगी पडून आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करण्यास सुरुवात केली.
या घटनेची माहिती श्री. अमोल माळी सर यांनी, अग्निशमन दलास दिली. सदर माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीचा भडका विझविला. त्यामुळे वाहनासह परिसरातील इतर मालमत्तेचे संभाव्य नुकसान टळले.
या बचावकार्यात अग्निशमन दलाचे दिनेश बिऱ्हाडे, फारुक शेख, रफिक पठाण, आकाश संदानशिव आणि आकाश बाविस्कर यांनी तत्परतेने सहभाग घेतला. त्यांच्या प्रसंगावधानामुळे आणि कर्तव्यदक्षतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

