नव्या पिढीला नेतृत्वाची संधी देत ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम; ग्रामविकासात युवकांच्या सहभागाचा विधायक संदेश
प्रतिनिधी | अंचलवाडी, ता. अमळनेर : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत अंचलवाडी ग्रामपंचायतीने युवकांना नेतृत्वाची संधी देत अभिनव आणि अनुकरणीय उपक्रम राबविला. ग्रामपंचायत कार्यालय तसेच जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत युवकांच्या हस्ते ध्वजारोहण करून नव्या पिढीच्या कर्तृत्वाला वाव देण्याचा विधायक संदेश ग्रामस्थांसह संपूर्ण तालुक्याला दिला.
ग्रामपंचायत कार्यालयात तुषार राजेंद्र पाटील (रवंदळे) यांच्या हस्ते, तर जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत वासुदेव दादाभाऊ पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी परंपरेला अभिवादन करण्यात आले.
युवकांना केवळ औपचारिक उपस्थितीपुरते सीमित न ठेवता त्यांच्यावर विश्वास व्यक्त करून प्रत्यक्ष नेतृत्वाची धुरा सोपविण्याचा निर्णय सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी सामूहिकरीत्या घेतला. त्यामुळे युवकांच्या अंगी असलेल्या ऊर्जा, कल्पकता आणि नेतृत्वक्षमतेला सकारात्मक दिशा देण्याचा स्तुत्य प्रयत्न या निमित्ताने झाला.
ग्रामजीवनाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक क्षेत्रात युवकांचा सहभाग वृद्धिंगत व्हावा, त्यांच्या मनात सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव दृढ व्हावी आणि ग्रामविकासाच्या वाटचालीत नव्या पिढीने सक्रिय सहभाग नोंदवावा, या उदात्त हेतूने हा उपक्रम साकारण्यात आला.
आजच्या काळात अनेक ठिकाणी स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम पारंपरिक चौकटीत पार पडत असताना अंचलवाडी ग्रामपंचायतीने युवकांना ध्वजारोहणाचा मान देत रूढ चौकटीपलीकडे जाणारा आदर्श निर्माण केला आहे. “युवकांना संधी दिली, तर नेतृत्वाची नवी क्षितिजे खुली होतात,” हा आशय या उपक्रमातून प्रकर्षाने अधोरेखित झाला.
ग्रामविकासाची धुरा सक्षम हातात सोपविण्यासाठी नव्या पिढीला संधी, प्रोत्साहन आणि जबाबदारी देणे आवश्यक आहे. अंचलवाडी ग्रामपंचायतीने घेतलेला हा निर्णय त्याच दिशेने टाकलेले आश्वासक पाऊल मानले जात आहे.
युवकांना प्राधान्य देणाऱ्या या अभिनव उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत असून, तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनीही युवकाभिमुख आणि विधायक उपक्रमांचा अंगीकार करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

