प्रशासनाचे नियोजन पूर्ण; आठ केंद्रांवर सकाळी १० वाजतापासून मदत सामग्रीचे वाटप सुरू होणार…
प्रतिनिधि, अमळनेर, १३ ऑगस्ट २०२६: अमळनेर तालुक्यात ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. अमळनेर नगरपरिषद हद्दीतील नैसर्गिक आपत्तीने बाधित झालेल्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू व किराणा किटचे वाटप शुक्रवार, दिनांक १४ ऑगस्ट २०२६, सकाळी ११ वाजे पासून करण्यात येणार आहे. याबाबत तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी, अमळनेर यांच्या कार्यालयाकडून सविस्तर आदेश पारित करण्यात आले असून विशेष पथकांची नियुक्ती करून वाटप प्रक्रिया व्यवस्थित व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याची तयारी पूर्ण झाली आहे.
बाधित नागरिकांना मदत सहज व वेळेवर उपलब्ध व्हावी, यासाठी शहरातील आठ विविध ठिकाणी वाटप केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या सर्व केंद्रांवर १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजतापासून किराणा किटचे वाटप सुरू केले जाईल. प्रशासनातर्फे निश्चित केलेली वाटप केंद्रे पुढीलप्रमाणे आहेत:
१. भोई समाज मंगल कार्यालय, पैलाड
२. शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र, ताडेपुरा
३. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, गांधलीपुरा
४. संत सखाराम महाराज वाडी
५. शिवाजी विद्या मंदिर, तांबेपुरा
६. क्षत्रिय कांचमाळी पंचमढी, बहादरपूर नाका रोड
७. शिवम कुटी बोर्डाजवळ, झामी चौक
८. विद्या विहार कॉलनी गेटजवळ
या वाटप प्रक्रियेत प्रति बाधित कुटुंबास एक किराणा किट देण्यात येणार आहे. मदत घेण्यासाठी संबंधित नागरिकांनी स्वतःची किंवा कुटुंबातील सदस्याची ओळख पटवणे आवश्यक राहील. वाटप प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखण्यासाठी मदत देताना लाभार्थ्यांचा फोटो घेण्यात येईल तसेच वाटप केल्याबाबतची स्वाक्षरी घेतली जाईल. यामुळे कोणत्याही प्रकारची अनियमितता टाळता येईल व योग्य लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
प्रशासनाकडून सर्व संबंधित बाधित नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी निर्धारित वेळेत संबंधित वाटप केंद्रावर उपस्थित राहावे व ओळखपत्रासह येऊन मदत स्वीकारावी. तसेच वाटप प्रक्रियेत प्रशासनास पूर्ण सहकार्य करावे, जेणेकरून ही मदत योजना सुव्यवस्थितपणे पूर्ण होईल.

