सखोल पुनरीक्षण मोहिमेची अंतिम मुदत जवळ येताच प्रशासनासमोर आव्हान; नागरिकांना १७ ऑगस्टपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन
प्रतिनिधि, अमळनेर, १४ ऑगस्ट २०२६: भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत अमळनेर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम जोरात सुरू आहे. या मोहिमेदरम्यान तब्बल ४० हजार मतदारांची नावे अनुपस्थित, स्थलांतरित अथवा मयत म्हणून नोंदवण्यात आल्याने स्थानिक प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन माहिती गोळा केली. या सर्वेक्षणात दुबार नोंदी, मृत व्यक्तींची नावे, स्थलांतरित मतदार आणि संबंधित पत्त्यावर प्रत्यक्ष राहणारे नसलेले मतदार अशा अनेक बाबी समोर आल्या. परिणामी सुमारे ४० हजार नोंदी या श्रेणीत समाविष्ट झाल्या आहेत. यामुळे पात्र मतदारांमध्येही गोंधळ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आता अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक असताना या सर्व नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी, आवश्यक कागदपत्रांची तपासणी आणि पात्र मतदारांची नावे कायम ठेवण्याची प्रक्रिया पूर्ण करणे हे प्रशासनासाठी कठीण काम ठरत आहे. काही पात्र मतदार कामाच्या निमित्ताने बाहेरगावी असतील किंवा त्यांच्यापर्यंत संपर्क होऊ शकला नसेल, तर त्यांचे नाव चुकीने वगळले जाण्याची भीतीही नागरिक व्यक्त करत आहेत.
प्रशासनाने सर्व नागरिकांना स्पष्ट आवाहन केले आहे की, आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे नाव मतदार यादीत आहे की नाही, याची स्वतः खात्री करावी. एखाद्या जिवंत आणि अमळनेर मतदारसंघात वास्तव्य असलेल्या पात्र मतदाराचे नाव अनुपस्थित, स्थलांतरित किंवा मयत यादीत दिसल्यास ताबडतोब संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आणि आवश्यक पुरावे सादर करावेत.
स्थलांतरित झाल्यानंतरही जुन्या पत्त्यावर राहिलेल्या नोंदी, मृत व्यक्तींची नावे आणि प्रत्यक्ष वास्तव्य नसलेल्या मतदारांच्या नोंदींची तपासणी अद्याप सुरू आहे. काही मतदारांचा शोध अद्याप लागलेला नसल्याने बीएलओंची धावपळ वाढली आहे. अंतिम मुदत जवळ आल्याने ४० हजार नोंदींची खातरजमा करणे हे आता प्रशासनासाठी खरी कसोटी ठरले आहे.
मतदार यादी अधिक अचूक आणि शुद्ध बनविणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. अपात्र, मृत किंवा स्थलांतरित नोंदी काढून टाकणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पात्र मतदाराचे नाव चुकीने वगळले जाणार नाही, याची दक्षता घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता स्वतःची आणि कुटुंबातील सदस्यांची नावे तपासून पहावीत.
उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी सांगितले की, १७ ऑगस्टपर्यंत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक माहिती आणि कागदपत्रे सादर करावीत. पात्र मतदारांची नावे सुरक्षित राहावीत आणि मतदार यादी अधिक अचूक व्हावी, यासाठी सर्व नागरिकांनी या विशेष मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

