पाच पावली मंदिर समोरील दुभाजकातील संरक्षक जाळ्या ठरतायेत जीवघेण्या, अपघाताची मालिका सुरूच…
प्रतिनिधी | अमळनेर
अमळनेर शहरातील मुख्य वाहतूक ही राज्य महामार्ग १५ द्वारे होत असते. या मार्गावर, शहरातील मुख्य रस्ता असल्यामुळे, पैलाड नाका ते आर के नगर या भागात नागरिकांची मुख्य वर्दळ व वाहतूक होत असते.
मात्र पाच पावली मंदिर समोरील दुभाजकातील संरक्षक जाळ्या पूर्णपणे बंद नसल्यामुळे, याठिकाणी नागरिक रस्ते ओलांडण्या करीता याचा वापर करीत असल्यामुळे याठिकाणी खूप अपघात होत असतात.
आजच संबंधित ठिकाणी, अपूर्ण संरक्षक जाळ्या मधून एक नागरिक रस्ता ओलांडत असताना, त्याला एका डंपर ने धडक दिली. रस्त्यावर जोरात आपटला गेल्यामुळे त्या नागरिकाचे डोके फुटले व तो रक्तबंबाळ होऊन रस्त्याच्या कडेला पडलेला होता. अपघात होताच डंपर चालक तिथून फरार झाला. स्थानिक दुकानदारांनी अँब्युलन्स बोलावून त्या अपघातग्रस्त व्यक्तीला दवाखान्यात दाखल केले.
स्थानिक दुकानदारांनी दिलेल्या माहिती नुसार, सदर ठिकाणीं यापूर्वीही वेगवेगळ्या स्वरूपात रस्ते अपघात घडलेले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात नागरिक, शालेय मुले व प्रवासी ये-जा करीत असतात. त्यामुळे ह्या ठिकाणी मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारत येत नाही. याठिकाणी वाढत्या अपघातामुळे, नागरिकांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे. सदर ठिकाणीं संरक्षक जाळ्या ह्या पूर्णपणे बंद कराव्यात ही मागणी नागरिकांमार्फत होत आहे.
हा संपूर्ण काँक्रिट रस्ता हायब्रीड ॲन्युइटी मॉडेल अंतर्गत या रस्त्याची दहा वर्षे देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार मे. बी. आर. भदाणे, धुळे व धुळे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कडे आहे. सहा वर्षांपूर्वी राज्य शासनाच्या हायब्रीड ॲन्युइटी मॉडेल अंतर्गत हा रस्ता अमळनेर सार्वजानिक बांधकाम विभाग यांच्या कडून धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील जबाबदारी झटकली, तर धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही आवश्यक देखरेख व नियंत्रण होत नसल्याचा चित्र समोर आले आहे.
आवश्यतेनुसार योग्य ती देखभाल ही संबंधितांकडून होत नसल्यामुळे, याठिकाणी वाढत्या अपघातामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. ठेकेदार, धुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष्य देण्याची मागणी स्थानिक दुकानदार व नागरिक करीत आहेत.

