जीत स्टुडिओतर्फे गरजू व विधवा भगिनींना साडी भेट; आज सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथील कार्यक्रमाला कवयित्री गुंजन पाटील यांची प्रमुख उपस्थिती…
प्रतिनिधी | अमळनेर : जीत स्टुडिओ अँड इव्हेंट मॅनेजमेंटतर्फे रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर येथे “आनंदाची साडी, सन्मानाची दिवाळी” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात समाजातील संघर्ष करणाऱ्या, गरजू आणि विधवा भगिनींना सन्मानपूर्वक साडी भेट देण्यात येणार असून, कार्यक्रमासाठी प्रवेश निःशुल्क ठेवण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवयित्री व खान्देशकन्या कु. गुंजन पाटील या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लावणार आहेत. “स्नेहाचा आणि आपुलकीचा उपक्रम” असे या उपक्रमाचे स्वरूप असून, कार्यक्रमाची वेळ सायंकाळी ६ ते ८:३० अशी आहे. या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन श्री. जीत संदानशिव, संचालक, जीत स्टुडिओ, यांनी केले आहे.
यंदाच्या दिवाळीत कष्टकरी भगिनींच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलवण्यासाठी हा उपक्रम राबवला जात असल्याचे आयोजकांनी सांगितले. भगिनींच्या आयुष्यात दिव्यांचा प्रकाश पेरून खऱ्या अर्थाने स्नेहाची आणि आनंदाची दिवाळी साजरी करूया, असे आवाहन जीत संदानशिव यांनी नागरिकांना केले आहे.
![]()

