ग्रामीण रुग्णालयाजवळील घटना; पोलीस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे वाचले पिलांचे प्राण, जेसीबीच्या साह्याने यशस्वी बचावकार्य…
प्रतिनिधी | अमळनेर : ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला रस्त्यावरील चेंबरमध्ये अडकलेल्या श्वानाच्या दोन पिलांना अग्निशमन दलाने तब्बल तीन तास अथक प्रयत्न करून जेसीबीच्या साह्याने सुखरूप बाहेर काढले. पोलीस कर्मचाऱ्याची सतर्कता आणि अग्निशमन दलाची तत्परता यामुळे या मुक्या जीवांचे प्राण वाचले. या यशस्वी बचावकार्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
ही घटना दुपारी सुमारे ४.५० वाजता घडली. ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरील चेंबरमध्ये कुत्र्याचे पिल्लू अडकल्याचे पोलीस कर्मचारी सिद्धांत शिसोदे यांच्या निदर्शनास आले. प्रसंगावधान राखत त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला दूरध्वनीद्वारे याबाबत माहिती दिली.
माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक विलंब न करता घटनास्थळी दाखल झाले. मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे यांच्या आदेशानुसार आणि अग्निशमन अधिकारी श्री. गणेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्याला सुरुवात करण्यात आली.
चेंबरमध्ये अडकलेल्या पिलांना बाहेर काढणे सोपे नसल्याने कर्मचाऱ्यांनी सुमारे तीन तास सातत्याने प्रयत्न केले. अखेर जेसीबी यंत्राच्या साह्याने दोन्ही पिलांना कोणतीही इजा न होता सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
या बचावकार्यात अग्निशमन दलाचे कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारुक शेख, जफर पठाण, सत्यन संदानशिव, आकाश बाविस्कर आणि आकाश संदानशिव यांनी मोलाची कामगिरी बजावली. सर्व कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे आणि परिश्रमामुळे हे कार्य यशस्वीपणे पार पडले. पोलीस कर्मचारी सिद्धांत शिसोदे यांनी दाखवलेली सतर्कता आणि संवेदनशीलता तसेच अग्निशमन दलाच्या तत्परतेचे परिसरातून कौतुक केले जात आहे.
![]()

