केंद्रबिंदू जमिनीखाली १० किमी खोलीवर; सुदैवाने जीवित किंवा वित्तहानी नाही…
प्रतिनिधी | जळगाव : आज शनिवारी सकाळी सुमारे ९.१५ ते ९.२० वाजताच्या दरम्यान जळगाव जिल्ह्यासह अनेक तालुक्यांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रावेर, यावल, चोपडा, भुसावळ आणि मुक्ताईनगर परिसरात जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण होऊन खळबळ उडाली. मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्याजवळ झालेल्या ४.५ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाची ही कंपने असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र आणि आंतरराष्ट्रीय भूकंप मापन यंत्रणांच्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली. केंद्रबिंदू खरगोनपासून सुमारे २७ किमी आणि धामनोदपासून सुमारे ६९ किमी अंतरावर, जमिनीखाली केवळ १० किमी खोलीवर होता. भूगर्भातील धक्का उथळ असल्याने केंद्रबिंदूच्या आसपासच्या मोठ्या परिसरात कंपने स्पष्टपणे जाणवली.
कोणत्या भागात धक्के जाणवले
जळगाव जिल्ह्यात चोपडा (केंद्रबिंदूपासून सुमारे ४६ किमी) आणि यावल (सुमारे ४९ किमी) परिसरात सौम्य हादरे बसले. याशिवाय भुसावळ शहर, मुक्ताईनगर, तसेच रावेर तालुक्यातील सावदा, रावेर, ऐनपूर, मोठा वाघोदा, खिर्डी यांसह परिसरातील विविध गावांमध्येही धक्के जाणवले. मध्य प्रदेशातील सेंधवा, बऱ्हाणपूर आणि खांडवा येथेही कंपने नोंदली गेली. नागरिकांच्या माहितीनुसार हे धक्के साधारण १ ते १.५ सेकंद जाणवले.
सकाळची वेळ असल्याने बहुतांश नागरिक दैनंदिन कामात व्यस्त होते. अचानक जमीन हादरल्याची जाणीव होताच अनेकांनी सावधगिरी म्हणून घराबाहेर धाव घेतली आणि नातेवाईक, शेजाऱ्यांकडे फोनवरून चौकशी केली. सोशल मीडियावरही या धक्क्यांची जोरदार चर्चा सुरू होती. सुदैवाने कोठेही पडझड, जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
प्रशासनाचे आवाहन
स्थानिक प्रशासनाने घटनेची नोंद घेतली असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता बाळगावी आणि अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
![]()

