अलीकडील अपघातानंतर नगर परिषदेला पत्र; रात्रीच्या प्रवासात धोका वाढल्याचा दावा…
प्रतिनिधी | अमळनेर : शहरातील पिंपळे नाल्याला संरक्षक कठडे नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, तातडीने कठडे बसवावेत, अशी मागणी प्रभाग क्रमांक ८ ब च्या नगरसेविका अपूर्वा जालंधर चौधरी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी २९ ऑक्टोबर रोजी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना पत्र दिले आहे.
नुकतीच या ठिकाणी एका तरुणाचा रात्रीच्या वेळेस दुचाकीवर अपघात झाल्याची घटना घडली. अशा दुर्घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी उपाययोजना आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या मार्गाने जाणारे नागरिक व वाहनचालक यांना अपघाताचा मोठा धोका आहे.
नगर परिषदेने प्रत्यक्ष पाहणी करून धोकादायक ठिकाणी कठडे उभारावेत, अशी त्यांची मागणी आहे. तसेच वाहनचालकांना रस्ता व नाल्याचा अंदाज यावा, म्हणून कठड्यांवर रिफ्लेक्टर (परावर्तक पट्ट्या) लावाव्यात आणि आवश्यक ठिकाणी इशारा फलक बसवावेत, असेही त्यांनी सुचवले आहे. नागरिकांच्या जिवाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन या कामावर त्वरित कार्यवाही करावी, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.
![]()

