डीसीपीएस, एनपीएस, यूपीएस व आरएनपीएस योजनांना विरोध; राज्यभरातील कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा निषेध नोंदविण्याचा निर्णय…
विशेष बातमी | महाराष्ट्र : जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेतर्फे शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी राज्यभरातील कर्मचारी, अधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काळ्या फिती लावून कामकाज करणार आहेत. डीसीपीएस (DCPS), एनपीएस (NPS), यूपीएस (UPS) व आरएनपीएस (RNPS) या पेन्शन योजनांना विरोध दर्शवून जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी हे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेच्या प्रश्नाकडे वेधण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे.
महाराष्ट्र शासनाने ३१ ऑक्टोबर २००५ रोजी अधिसूचना काढून १ नोव्हेंबर २००५ पासून सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन पेन्शन योजना लागू केली होती. या निर्णयाला ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी २१ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संघटनेने निषेध आंदोलनाची हाक दिली आहे. संबंधित पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या भविष्याची पुरेशी आर्थिक हमी मिळत नसल्याची भूमिका संघटनेने मांडली आहे.
डीसीपीएस, एनपीएस, यूपीएस व आरएनपीएस या योजना रद्द करून महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम, १९८२ आणि महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाच्या अंशराशीकरणाचे नियम, १९८४ यांनुसार भविष्य निर्वाह निधीसह जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना गेल्या ११ वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत असून, या लढ्यात काही प्रमाणात यश मिळाले असले तरी अंतिम मागणीची पूर्तता होण्यासाठी संघर्ष सुरू ठेवावा लागणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पुढील टप्प्याची सुरुवात या काळी फीत आंदोलनातून करण्यात येणार आहे. या आंदोलनाची पूर्वसूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाला निवेदनाद्वारे देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व संबंधित कर्मचारी, अधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपापल्या शाळा आणि कार्यालयांमध्ये काळ्या फिती लावून नियमित कामकाज करत निषेध नोंदवावा, असे आवाहन संघटनेने केले आहे.
या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. कुणाल पवार, जिल्हा सरचिटणीस विपिन पाटील, राज्य पदाधिकारी विनायक चौथे व संजय सोनार यांच्यासह जिल्हा पदाधिकारी राकेश पाटील, कल्पेश चौधरी, नाना पाटील, सचिन चव्हाण, दीपक गिरासे, प्रशांत बाविस्कर, दीपक कोंडे, भास्कर वानखेडे, योगेश गांधेले, उमेश भदाने, सुनील ढाके, भालचंद्र पवार, राकेश शिंपी, यशवंतराव बोरसे, किरण सनेर, विवेक पाटील, मुजिबुर रहमान, गोपाळ पाटील, पंकज माळी, जितेंद्र पवार, गिरीश महाजन, दिनेश चव्हाण, टी. एम. करणकाळ, दिनेश शिर्के, लोकेश पाटील, नितीन माळी, उमाकांत हिरे, सचिन देशमुख, श्रीकांत कुलकर्णी, संतोष धनगर, प्रफुल पाटील, दीपक भोसले, अनिल वराडे, सोपान पारधी, कमलेश महाजन, मुकेश पाटील, अभिजित साळुंखे, कैलास घोलाने, राहुल पाटील, संदीप सनेर, सुनील पारधी, पल्लवी गरुड, सुनीता पाटील, ज्योत्स्ना केदारे, माधवी गरुड, प्रेमलता पाटील, अॅड. मनीषा देशमुख, सुवर्णा धनगर, कुलश्री गवळी, शुभांगी महालपुरे, तुळसा दुधे, निलिमा माळी, पाकीजा पिंजरी, सविता अहिरे आणि रोहिणी पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
![]()

