प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून संघटनात्मक जबाबदारी; अमळनेर तालुका काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन…
प्रतिनिधी | अमळनेर : अमळनेर येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक मनोज भाऊराव पाटील यांची नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम विभागाच्या काँग्रेस पक्षाच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी २६ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या पत्राद्वारे ही नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे अमळनेर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनोज पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
मनोज पाटील यांनी अमळनेर नगर परिषदेत नगरसेवक म्हणून काम करताना शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी योगदान दिले आहे. नगर परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. या कार्यकाळात शहरातील विकासकामांना प्राधान्य देतानाच नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करण्यावर त्यांनी भर दिला.
काँग्रेस पक्षातील संघटनात्मक कामकाज, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत, कर्तव्यदक्षता आणि नियोजनबद्ध कार्यशैली यांची दखल घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या राजकीय अनुभवाचा आणि संघटनात्मक कौशल्याचा उपयोग नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम विभागात पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मनोज पाटील हे अमळनेरचे माजी विधान परिषद सभापती कै. दाजीबा पर्वत पाटील यांचे सुपुत्र आहेत. त्यांना राजकीय आणि सामाजिक कार्याचा वारसा लाभला असून, स्थानिक स्वराज्य संस्थेतील कामकाजाच्या अनुभवातून त्यांनी काँग्रेस पक्षात आपली ओळख निर्माण केली आहे. आता नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम विभागाची जबाबदारी मिळाल्याने त्यांच्या राजकीय कार्यक्षेत्राचा विस्तार झाला आहे.
या नियुक्तीबद्दल अमळनेर तालुका काँग्रेसचे पदाधिकारी भागवत सूर्यवंशी, गजेंद्र साळुंखे, सुलोचना वाघ, राजेंद्र चौधरी सर, संदीप घोरपडे, बन्सीलाल भागवत, शरद पाटील, कैलास पाटील, प्रवीण जैन, सईद तेली, डॉ. रवींद्र पाटील, सुधाकर भैसे, पी. वाय. पाटील, शिंदे, दिलीप पाटील, राकेश पवार आणि तौसीब तेली यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
![]()

