२६ सप्टेंबरला दुसरा शनिवार, २७ सप्टेंबरला रविवार; SBI, युनियन बँकेचा ग्राहकांना व्यवहार आधी पूर्ण करण्याचा सल्ला…
विशेष बातमी : पाच दिवसांचा बँकिंग आठवडा, निवृत्तीवेतनातील सुधारणा, समान महागाई भत्ता आणि NPS कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा पर्याय यांसह विविध मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) २८ ते ३० सप्टेंबर २०२६ रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. संप झाल्यास २६ सप्टेंबरचा दुसरा शनिवार आणि २७ सप्टेंबरचा रविवार यामुळे बँक शाखा सलग पाच दिवस बंद राहण्याची शक्यता आहे.
संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ मंत्रालय सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या प्रमुखांसोबत ग्राहक सेवा सुरू ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्था निश्चित करणार आहे. दरम्यान, SBI आणि युनियन बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना शाखेतून करावयाचे महत्त्वाचे व्यवहार २६ सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
संपाच्या काळात एटीएम, UPI, मोबाइल व इंटरनेट बँकिंग, ADWM, बिझनेस करस्पॉन्डंट केंद्रे आणि ग्राहक सेवा केंद्रांसारख्या डिजिटल व पर्यायी सुविधा सुरू राहणार आहेत. मात्र, प्रत्यक्ष शाखेत जाऊन करावयाचे व्यवहार प्रभावित होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी त्यांचे नियोजित व्यवहार आधीच पूर्ण करून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
![]()

