जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांच्या संघटनात्मक विस्ताराची जबाबदारी…
प्रतिनिधी | अमळनेर : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी प्रा. डॉ. विजय शालिग्राम गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मान्यतेने राज्य संघटक किशोर रायसाकडा, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश विसपुते आणि खान्देश विभागीय अध्यक्ष डॉ. समाधान मैराळे यांनी नियुक्तीपत्राद्वारे ही घोषणा केली.
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि अहिल्यानगर या पाच जिल्ह्यांमध्ये संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे वाढविण्याची जबाबदारी प्रा. डॉ. गाढे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासह खान्देश विभागात संघटनेच्या वाढीसाठी आणि विस्तारासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.
संघटनेची ध्येयधोरणे, उद्दिष्टे व नियमावलीच्या अनुषंगाने उत्तर महाराष्ट्रातील संघटनात्मक कार्य बळकट करणे, पत्रकार बांधवांना संघटनेच्या माध्यमातून एकत्रित करणे आणि नव्या भागांत संघटनेचा विस्तार करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन नियुक्तीपत्रातून करण्यात आले आहे.
प्रा. डॉ. विजय गाढे यांच्या अनुभवाचा, कार्यक्षमतेचा आणि संघटन कौशल्याचा संघटनेच्या पुढील वाटचालीस लाभ होईल, असा विश्वास राज्य संघटक किशोर रायसाकडा यांनी व्यक्त केला. ही नियुक्ती राज्य समन्वयक संजय जी. भोकर, राज्य अध्यक्ष नितेश सोमाणी, राज्य सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे आणि राज्य संघटक किशोर रायसाकडा यांच्या मान्यतेने करण्यात आली.
या नियुक्तीबद्दल पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातून प्रा. डॉ. विजय शालिग्राम गाढे यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त होत आहेत. यावेळी संघाचे खान्देश उपाध्यक्ष राकेश सुतार, अमळनेर तालुका अध्यक्ष सुरेश कांबळे, तालुका सचिव नूरखान आदी उपस्थित होते.
![]()

