अमळनेरमध्ये शांतता समितीची बैठक; रस्ते दुरुस्ती आणि परवानग्यांसाठी ‘सिंगल विंडो’ची सुविधा…
प्रतिनिधी | अमळनेर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, गणेश मंडळांनी यंदाचा उत्सव शांततेत आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करावा, तसेच डीजेचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन जळगावचे पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी केले. गणेशोत्सवातील विविध परवानग्या सुलभ करण्यासाठी नगरपरिषदेत ‘सिंगल विंडो’ व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली असून, शहरातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीबाबतही लवकरच कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
गणेशोत्सवानिमित्त मंगळवार, १ सप्टेंबर रोजी वाणी मंगल कार्यालय येथे पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक पार पडली. बैठकीला अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी श्री. मयूर भंगाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनायक कोते, अमळनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. दत्तात्रय निकम, लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. परीक्षित बाविस्कर आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे दैनिक नवराष्ट्रचे वरिष्ठ पत्रकार, अण्णासाहेब संजय पाटील यांनी केले.

बैठकीत पोलीस, महसूल, महावितरण आणि अमळनेर नगरपरिषद या विभागांच्या अधिकाऱ्यांसह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार आणि विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी सहभागी झाले. गणेशोत्सवाच्या तयारीसंदर्भात मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनासमोर विविध समस्या व सूचना मांडल्या.
गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील खराब रस्त्यांची दुरुस्ती करावी, तसेच गणेशोत्सवासाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्या मिळविताना मंडळांना वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जावे लागू नये यासाठी नगरपरिषद, पोलीस विभाग आणि महावितरण यांच्या समन्वयातून ‘सिंगल विंडो’ व्यवस्था अधिक प्रभावीपणे राबवावी, अशी मागणी केली. तसेच उत्सव संपल्यानंतर आढावा बैठक घेऊन गणेश मंडळांच्या समस्या व कायमस्वरूपी उपाययोजनांवर चर्चा करावी, अशी सूचनाही करण्यात आली.
उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनायक कोते यांनी अमळनेर व मारवड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण सुमारे २०० गणेश मंडळे असल्याची माहिती दिली. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असून, उत्सव शांततेत पार पडण्यावर पोलिसांचा भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे यांनी सांगितले की, विविध परवानग्यांसाठी नगरपरिषदेत ‘सिंगल विंडो’ व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते दुरुस्ती आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषदेच्या संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत गणेश मंडळांकडून प्राप्त होणाऱ्या सूचनांनुसार शहरातील खराब रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येईल, अशी हमी त्यांनी दिली.
उपविभागीय अधिकारी श्री. मयूर भंगाळे यांनी अमळनेर शहरात विविध धर्मांचे सण शांततेत साजरे केले जात असल्याचे नमूद केले. ही शांततेची परंपरा कायम ठेवत गणेशोत्सवही उत्साहासोबत शांततेत साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले. यंदाच्या गणेशोत्सवात डीजेचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने वाद्य वाजवून उत्सव साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

अध्यक्षीय समारोप करताना पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा भाग असल्याचे सांगितले. १८८२ पासून महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत असल्याचा उल्लेख करत त्यांनी उत्सवाचे पावित्र्य आणि सामाजिक सलोखा जपण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र शासनाने गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
गणेशोत्सवात सहभागी होताना कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी मंडळांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. मागील काही वर्षांत जळगाव जिल्ह्यात गणेशोत्सवादरम्यान गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले होते; मात्र मागील वर्षी त्यात मोठी घट झाली. यंदाही हीच शांततेची परंपरा कायम ठेवून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच डीजेचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांच्या साथीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना केले.
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर येत असल्याने वाहतूक व्यवस्था, मिरवणुकीचे मार्ग, विद्युत व्यवस्था, स्वच्छता, रस्त्यांची स्थिती आणि कायदा-सुव्यवस्था या बाबींमध्ये विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे गणेश मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून उत्सवाचा आनंद घेतानाच सामाजिक सलोखा, सुरक्षितता आणि शांतता अबाधित ठेवणे अपेक्षित आहे.
![]()

