जानवेत पत्री शेडमध्ये सुरू होता प्रकार; १० लिटर भेसळयुक्त दूध १०० लिटर गायीच्या दुधात मिसळल्याचा पोलिसांचा दावा — २७ वर्षीय तरुणाला अटक…
प्रतिनिधी | अमळनेर : ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचणारे दूध नेमके किती शुद्ध आहे, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दुधाचा फॅट वाढवून त्याची विक्री करण्यासाठी भेसळयुक्त दूध तयार करून ते गायीच्या दुधात मिसळले जात असल्याचा प्रकार जानवे येथे उघडकीस आला. अन्न व औषध प्रशासन आणि अमळनेर पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत महेश दिलीप पाटील (वय २७, रा. जानवे) याला अटक करण्यात आली आहे.
जानवे-इंदपिंप्री रस्त्यावर असलेल्या एका पत्री शेडवर रविवारी (३० ऑगस्ट) दुपारी साडेतीनच्या सुमारास पथकाने छापा टाकला. कारवाईवेळी महेश पाटील हा मिक्सरच्या सहाय्याने भेसळयुक्त दूध तयार करताना आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या ठिकाणी मिक्सर, सोयाबीन तेल, लोखंडी कॅन, गायीचे दूध आणि इतर साहित्य आढळून आले. त्यामुळे दूध तयार करण्याच्या या प्रक्रियेमागे नेमका उद्देश काय होता, याचा तपास यंत्रणांकडून करण्यात येत आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपीने सुमारे १० लिटर भेसळयुक्त दूध तयार करून ते १०० लिटर गायीच्या दुधात मिसळले जात असल्याचे सांगितले. दुधाचा फॅट वाढवण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याचेही तपासात समोर आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. इतकेच नव्हे, तर हे दूध पुढे धुळे येथे विक्रीसाठी पाठवले जात असल्याची माहितीही आरोपीने दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना जानवे येथे भेसळयुक्त दूध तयार केले जात असल्याची माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी त्यांनी जळगाव येथील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर दोन्ही यंत्रणांनी संयुक्तपणे कारवाई केली.
अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आकाश बोराडे व ऋषभ चव्हाण यांच्या उपस्थितीत पोलिसांचे पथक शेडवर पोहोचले. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पीएसआय नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील, सुनील तेली, विनोद संदानशीव, नितीन मनोरे, निलेश मोरे आणि सागर साळुंखे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
अन्न व औषध प्रशासन अधिकारी आकाश बोराडे यांच्या फिर्यादीवरून महेश दिलीप पाटील याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ मधील कलम २६(१), २७(३), ३१(१), ३१(२), ५९ तसेच भारतीय न्याय संहितेतील कलम २७४, २७५, १२३ आणि ३१८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, प्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.
जानवेत एका ठिकाणी झालेली ही कारवाई महत्त्वाची असली, तरी त्यातून एक मोठा प्रश्न समोर येतो—दुधाचा फॅट वाढवण्यासाठी अशा पद्धतीने भेसळ केली जात असेल, तर तयार झालेले दूध नेमके कुठपर्यंत पोहोचले? त्यातून किती ग्राहकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे? आणि अशा प्रकारच्या आणखी ठिकाणांची तपासणी होणार का?
या प्रश्नांची उत्तरे तपासातूनच स्पष्ट होतील. मात्र दूध हे रोजच्या आहारातील अत्यावश्यक पदार्थ असल्याने भेसळीचा हा प्रकार केवळ आर्थिक फसवणुकीचा विषय न राहता सार्वजनिक आरोग्याशी जोडलेला गंभीर प्रश्न ठरतो.
![]()

