भीषण अपघातात एकाची मान व हात धडापासून वेगळे; अमळनेर-गलवाडे रस्त्यावर पेट्रोल पंपाजवळ दुर्घटना…
प्रतिनिधी | अमळनेर : अमळनेर-गलवाडे रस्त्यावर पेट्रोल पंपाजवळ धावत्या स्कुटीची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला जोरदार धडक झाल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. ही भीषण दुर्घटना ३० ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे दीड वाजेच्या सुमारास घडली. अपघाताची तीव्रता एवढी होती की स्कुटीचालक पंडित धाकू भिल यांची मान व हात धडापासून वेगळे होऊन पडले.
या अपघातात रंजाणे येथील पंडित धाकू भिल (वय ५०) आणि नागो अमृत सपकाळे (वय ४५) यांचा मृत्यू झाला. दोघेही स्कुटी क्रमांक एमएच ५४ ई ७६४ वरून गलवाडे येथे भंडारा प्रसादाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. पंडित भिल हे स्कुटी चालवत होते, तर नागो सपकाळे मागे बसले होते.
गलवाडे येथील कार्यक्रम आटोपून दोघे अमळनेरकडे परतत असताना पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या स्कुटीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या डंपर क्रमांक एमएच १८ एम ७८५७ ला स्कुटीने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की पंडित भिल यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. नागो सपकाळे यांनाही जोरदार मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, उपनिरीक्षक समाधान गायकवाड, नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, वाहतूक पोलीस संजय बोरसे, विनय पाटील, मयुर पाटील, गणेश पाटील आणि अविनाश भदाणे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. अपघाताबाबत पुढील पोलीस तपास सुरू आहे.
![]()

