मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचा गौरव…
प्रतिनिधि |अमळनेर : खानदेश शिक्षण मंडळ संचालित श्रीमती डि. आर. कन्या शाळेत मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती नूतन किशोर भोई आणि आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेती सुकेशनी समाधान सपकाळे या खेळाडूंचा सन्मान व सत्कार करण्यात आला.
शाळेच्या सकाळ व दुपारच्या दोन्ही विभागांत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच क्रीडा साहित्याचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी होत्या. यावेळी उपमुख्याध्यापक एस. आर. शिंगाणे, पर्यवेक्षक एस. पी. वाघ, शिक्षक प्रतिनिधी पी. पी. जोशी, एस. एस. माळी, क्रीडा विभागप्रमुख आर. एस. सोनवणे मॅडम तसेच शामभाऊ पवार यांच्यासह शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी मोठे ध्येय ठेवावे : मुख्याध्यापिका सूर्यवंशी मॅडम
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी यांनी मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाचा उल्लेख केला. देशासाठी केलेला त्याग, देशभक्ती, समर्पण आणि ऑलिम्पिकमधील कामगिरीच्या माध्यमातून त्यांनी भारताची मान उंचावल्याचे सांगितले.
मेजर ध्यानचंद यांच्या कार्यातून आजच्या पिढीने प्रेरणा घेऊन क्रीडा संस्कृती जोपासावी, मोठी स्वप्ने आणि ध्येय निश्चित करून ती साध्य करण्यासाठी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रातही देशासाठी मोठे योगदान देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय क्रीडा दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय सुवर्णपदक प्राप्त नूतन किशोर भोई तसेच आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक प्राप्त सुकेशनी समाधान सपकाळे यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्यांच्या यशातून विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्याची प्रेरणा मिळावी, हा कार्यक्रमामागील उद्देश होता.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर बंधू-भगिनींनी सहकार्य केले.
![]()

