पाच दिवसांत मातोश्री नगरात ही दुसऱ्यांदा चोरीची घटना; लॉक तोडून सोन्याचे दागिने व दानपेटीतील रोकड लंपास…
प्रतिनिधि | अमळनेर : मातोश्री नगर परिसरातील श्री चामुंडा माता मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे लॉक तोडून सोन्याचे दागिने आणि दानपेटीतील रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या पाच दिवसांत मातोश्री नगर परिसरात दुसऱ्यांदा चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास मंदिराच्या प्रवेशद्वाराचे लॉक तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर मंदिरातील कपाटे फोडून त्यातील ऐवजाची चोरी केली. देवीच्या अंगावरील सोन्याच्या टिकल्या, बांगड्या तसेच दानपेटीतील रोकड चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले आहे.
चोरी करताना चोरट्यांनी मंदिरातील कपाटे व इतर साहित्याची नासधूस केली. सकाळी मंदिरात चोरी झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांकडून पाहणी करून चोरीचा तपास सुरू करण्यात आला आहे.
सलग चोरीच्या घटनांनी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मातोश्री नगर परिसरात काही दिवसांच्या अंतराने चोरीची दुसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. मंदिरासारख्या धार्मिक स्थळालाही चोरट्यांनी लक्ष्य केल्याने परिसरातील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन सीसीटीव्ही फुटेज व इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
![]()

