नूतन भोईची राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात चमक; अमृता मितेश पाटीलची अंडर-१५ वर्ल्डकपसाठी भारतीय संघात निवड…
अमळनेर | प्रतिनिधी : राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या औचित्याने अमळनेर तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब समोर आली आहे. अमळनेरच्या दोन सुकन्यांनी आपल्या क्रीडा कौशल्याच्या जोरावर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यश संपादन केले असून, त्यांच्या कामगिरीने अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
भोईवाडा येथील नूतन किशोर भोई हिने इनलाइन रोलर स्केटिंग, आईस हॉकी आणि रायफल शूटिंग अशा विविध क्रीडा प्रकारांत राष्ट्रीय व विभागीय स्तरावर प्रतिनिधित्व करत आपली अष्टपैलू क्रीडा क्षमता सिद्ध केली आहे. तर अमळनेर येथील उद्योजक आर. के. पटेल परिवारातील सुकन्या दियाना उर्फ अमृता मितेश पाटील हिची दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या अंडर-१५ इनडोअर क्रिकेट वर्ल्डकपसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. महाराष्ट्रातून या संघात निवड झालेली अमृता एकमेव खेळाडू ठरली आहे.
नूतनची राष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी…
नूतन भोई हिने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात नाशिक विभागीय स्तरावर अचूकता व एकाग्रतेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. तसेच विशाखापट्टणम येथे झालेल्या ६३ व्या नॅशनल इनलाईन रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप-२०२५ मध्ये तिने राष्ट्रीय स्तरावर अमळनेरचे प्रतिनिधित्व केले. याशिवाय डेहराडून, उत्तराखंड येथे झालेल्या IHAI नॅशनल आईस हॉकी चॅम्पियनशिप-२०२६ मध्येही तिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये गुणवत्ता असूनही आर्थिक अडचणींमुळे अनेकांना संधीपासून वंचित राहावे लागते, अशी खंत नूतनने व्यक्त केली. ग्रामीण खेळाडूंना नियमित शिष्यवृत्ती, आर्थिक मदत, दर्जेदार क्रीडा साहित्य, तज्ज्ञ प्रशिक्षक आणि आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्यास अमळनेरसारख्या भागातूनही ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडू शकतील, असा विश्वास तिने व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी पदक मिळविण्याचे आपले ध्येय असल्याचेही तिने सांगितले.
अमृताची अंडर-१५ इनडोअर क्रिकेट वर्ल्डकपसाठी भारतीय संघात निवड…
दरम्यान, अमळनेरची सुकन्या दियाना उर्फ अमृता मितेश पाटील हिने क्रिकेट क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. मुंदडा ग्लोबल स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या अमृताची दक्षिण आफ्रिकेत २१ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या अंडर-१५ इनडोअर क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून ती नियमितपणे क्रिकेटचा सराव करत आहे. जळगाव येथे क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून झालेल्या राज्यस्तरीय अंडर-१५ स्पर्धेत तिने उत्कृष्ट फलंदाजी व विकेटकीपिंग करत प्रभावी कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर तिची भारतीय संघासाठी निवड झाली. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून भारतीय संघात स्थान मिळविणारी ती एकमेव खेळाडू ठरली आहे.
यापूर्वी धुळे येथे झालेल्या अंडर-१९ बॉईज क्रिकेट मालिकेतही अमृताने प्रभावी कामगिरी करत ‘मॅन ऑफ द सिरीज’ चा बहुमान मिळविला होता. क्रिकेटमधील तिच्या वाटचालीला प्रशिक्षक मिलिंद शिंदे व रोनक शेख यांचे मार्गदर्शन लाभले आहे. वर्ल्डकपच्या तयारीसाठी ती १० सप्टेंबरपासून बंगळुरू येथे सराव शिबिरात सहभागी होणार असून त्यानंतर दक्षिण आफ्रिकेकडे रवाना होणार आहे.
अमृताच्या भारतीय संघातील निवडीबद्दल राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर येथे तिचे कौतुक करून सत्कार केला. खासदार स्मिताताई वाघ, माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील आणि मुंदडा ग्लोबल स्कूलचे चेअरमन ओमप्रकाश मुंदडा यांनीही अमृता व तिच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले.
अमळनेरच्या क्रीडा क्षितिजावर दोन आश्वासक तारे
नूतन भोईची राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील कामगिरी आणि अमृताची वर्ल्डकपसाठी भारतीय संघातील निवड या दोन्ही घटना अमळनेरच्या क्रीडा इतिहासातील अभिमानाचा अध्याय ठरत आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत क्रीडा क्षेत्रात उंच भरारी घेणाऱ्या या दोन्ही सुकन्यांनी अमळनेर तालुक्यातील नव्या पिढीतील खेळाडूंसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या यशामुळे अमळनेरच्या क्रीडा क्षेत्रात नव्या आशा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

