पहाटे कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी अंत; त्याच मार्गावर सायंकाळी अज्ञात व्यक्तीनेही रेल्वेखाली जीवन संपवले…
अमळनेर | प्रतिनिधी : तालुक्यातील टाकरखेडा परिसरातील रेल्वेमार्गावर गुरुवारी दोन वेगवेगळ्या आत्महत्यांच्या घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली. पहाटे एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि त्यांच्या दोन चिमुकल्या मुलांचा रेल्वेखाली मृत्यू झाल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी टाकरखेडा-अमळनेर रेल्वेमार्गावर एका अज्ञात व्यक्तीने धावत्या रेल्वेखाली येऊन जीवन संपविल्याची घटना समोर आली.
पती-पत्नी आणि दोन मुलांचा दुर्दैवी अंत
टाकरखेडा येथे गुरुवारी पहाटे ४ ते ५ वाजेच्या सुमारास सुनील अमृत भिल, त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल आणि त्यांची दोन मुले सनी व राज यांनी रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. सनी हा दुसरीत शिकत होता, तर राज अंगणवाडीत जात होता.
प्राथमिक माहितीनुसार, चौघेही पहाटे घरातून बाहेर पडले. त्यानंतर रेल्वेमार्गावर जाऊन त्यांनी धावत्या रेल्वेखाली जीवन संपविल्याचे समोर आले. या घटनेत चौघांचाही जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती पहाटे सुमारे ४.४० वाजता रेल्वे अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच अमळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गणेश अहिरे, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, विजय भोई, योगेश बागुल आणि राहुल पाटील यांनी घटनास्थळी पंचनामा करण्याची कार्यवाही केली.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असावी, अशी चर्चा परिसरात असली तरी त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
सायंकाळी अज्ञात व्यक्तीचा रेल्वेखाली मृत्यू
दरम्यान, गुरुवारी सायंकाळी सुमारे ७ वाजता टाकरखेडा-अमळनेर रेल्वे मार्गावर खान्देश एक्स्प्रेससमोर एका अज्ञात इसमाने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून तिची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सदर व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास किंवा ती व्यक्ती परिचित असल्यास नागरिकांनी तातडीने अमळनेर रेल्वे पोलीस (GRP) किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
एकाच रेल्वेमार्गावर दिवसभरात दोन वेगवेगळ्या आत्महत्यांच्या घटना घडल्याने टाकरखेडा व अमळनेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विशेषतः दोन लहान मुलांसह संपूर्ण कुटुंबाचा झालेला दुर्दैवी अंत मन हेलावून टाकणारा ठरला आहे. दुसऱ्या घटनेतील मृत व्यक्तीची ओळख पटवून घटनेमागील परिस्थिती स्पष्ट करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

