लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सापळा कारवाई; दोघे संबंधीत ताब्यात…
प्रतिनिधी | धुळे : धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता यांचे लघुलेखक सुदेश दामोदर मानकर (वय ५५, मेडिकल वॉर्ड) आणि खाजगी इसम श्रीराम शंकर पाटील उर्फ दादू मोरे (वय ५१, रा. म्हाडा वसाहत, मोहाडी, ता. जि. धुळे) यांनी तक्रारदाराकडे १०,००० रुपयांची लाच मागितली. ही रक्कम लघुलेखक मानकर यांनी स्वतः स्वीकारल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांनी त्यांना रंगेहाथ पकडले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
तक्रारदार (पुरुष, वय ४३) हे शासकीय कर्मचारी असून दीर्घकाळ रुग्णनिवेदनावर होते. त्यांची तब्येत ठीक झाल्याने ते कर्तव्यावर हजर झाले. त्यांची वैद्यकीय तपासणी महाविद्यालयातील वैद्यकीय मंडळाकडून करण्यात आली होती, मात्र त्याचे प्रमाणपत्र कार्यालयास प्राप्त न झाल्याने त्यांनी महाविद्यालयात जाऊन चौकशी केली. तेथे खाजगी इसम श्रीराम मोरे यांनी त्यांना भेटून सकारात्मक वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी स्टेनो सुदेश मानकर यांच्याकरिता १५,००० रुपयांची लाच मागितली. त्यापैकी ५,००० रुपये त्यांनी लगेच स्वीकारले आणि उर्वरित १०,००० रुपये स्टेनो मानकर यांचा फोन आल्यावर त्यांना भेटून देण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांनी दि. ०५.११.२०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयात समक्ष हजर राहून तक्रार दिली.
दि. ०६.११.२०२६ रोजी पडताळणी कार्यवाहीदरम्यान तक्रारदार यांनी खाजगी इसम श्रीराम मोरे यांची भेट घेतली असता त्यांनी स्टेनो मानकर यांच्याकरिता १०,००० रुपयांची लाच मागितली. तसेच तक्रारदार यांनी स्टेनो मानकर यांची भेट घेतली असता त्यांनीही १०,००० रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्याचे मान्य केले. यानंतर विभागाने सापळा रचला आणि मानकर यांना १०,००० रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७, ७-अ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सापळा अधिकारी व सरकारतर्फे फिर्यादी म्हणून पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे काम पाहत आहेत. तपास अधिकारी पद्मावती कलाळ (पोलीस निरीक्षक) असून पर्यवेक्षक अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे काम पाहत आहेत.
सापळा पथकात स.फौ. राजन कदम, पोहेकॉ. मुकेश अहिरे, मकरंद पाटील, रामदास बारेला व प्रशांत बागुल यांचा समावेश होता. पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक) यांनी मार्गदर्शन केले.
![]()

