९ अधिकारी, ९५ पोलीस अंमलदार, आरसीपी, स्ट्रायकिंग फोर्ससह ११८ होमगार्ड सहभागी…
प्रतिनिधी | अमळनेर : गणेशोत्सव व अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अमळनेर पोलिसांकडून शहरातील संवेदनशील भागांत बुधवारी (२३ सप्टेंबर) रूट मार्च काढण्यात आला. सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० या वेळेत झालेल्या या रूट मार्चमध्ये ९ अधिकारी, ९५ पोलीस अंमलदार, एक आरसीपी, एक स्ट्रायकिंग फोर्स तसेच ११८ होमगार्ड सहभागी झाले.
अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव परिमंडळ तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या उपस्थितीत हा रूट मार्च घेण्यात आला. गणेश विसर्जनाच्या काळात शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण व्हावा आणि संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती प्रभावीपणे दिसून यावी, या उद्देशाने पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्गांवर संचलन केले.
रूट मार्चदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सुभाष चौक, मुख्य बाजारपेठ, तिरंगा चौक, पवन चौक, मंगलादेवी चौक, झामी चौक, आखाडा मकान-कसाली डीपी, वाडी चौक, पानखिडकी, सराफ बाजार, दगडी दरवाजा, पाचकंदील चौक आणि गांधलीपुरा पोलीस चौकी परिसराचा समावेश होता.
गणेशोत्सवाच्या अंतिम टप्प्यात तसेच अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील संवेदनशील भागांवर विशेष लक्ष केंद्रित केले असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.
![]()

