धुळे रोडवरील प्रवेशद्वाराच्या नामकरणासाठी शिवप्रेमींचे निवेदन; नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्याची विनंती…
प्रतिनिधी | अमळनेर : शहराच्या धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी अमळनेर तालुक्यातील शिवप्रेमी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले. या नामकरणाचा विषय नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडून त्याबाबत अधिकृत निर्णय जाहीर करावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
धुळे रोडवरील प्रवेशद्वार हे अमळनेर शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचे प्रवेशस्थळ आहे. या प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिल्यास शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळखीला नवी प्रतिष्ठा प्राप्त होईल, अशी भावना निवेदनकर्त्या शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे.
या मागणीसाठी यापूर्वी २६ मे २०२६ आणि २४ सप्टेंबर २०२६ रोजीही नगरपरिषद प्रशासनाला निवेदने देण्यात आली होती. मात्र, अद्याप या विषयावर अधिकृत निर्णय जाहीर न झाल्याने शिवप्रेमींनी पुन्हा निवेदन सादर करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेला संघर्ष, त्यांचे शौर्य, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत. शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराला त्यांचे नाव दिल्यास अमळनेरच्या वैभवात भर पडण्यासोबतच महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची ओळख नागरिकांना आणि शहरात येणाऱ्या पर्यटकांना होईल, अशी अपेक्षा शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे.
या मागणीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कोणती भूमिका घेतात, तसेच प्रवेशद्वाराच्या नामकरणाबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे अमळनेरमधील शिवप्रेमी नागरिकांचे लक्ष लागले आहे.
![]()

