शेती संवर्धन, पीक संरक्षण व शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन; जलतारा कामाचे भूमिपूजन…
प्रतिनिधी | नगाव खुर्द, ता. अमळनेर : तालुक्यातील नगाव खुर्द येथे २४ ऑक्टोबर रोजी कृषी विभागाच्या वतीने खेत बचाव अभियान व महिला शेतकरी प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी शेतकरी महिला व उपस्थित शेतकऱ्यांना शेती संवर्धन, पीक संरक्षण आणि महिला शेतकऱ्यांसाठीच्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसेच सरपंच सरला चंद्रकांत जगदाळे यांच्या हस्ते जलतारा कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी सी. जे. ठाकरे व मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती अमळनेरचे गटविकास अधिकारी नरेंद्र पाटील होते.
याप्रसंगी उपकृषी अधिकारी पी. आर. पाटील आणि सहाय्यक कृषी अधिकारी नवल वाघ यांनी उपस्थित शेतकरी बंधू-भगिनींना खेत बचाव अभियानाचे महत्त्व, शेती संवर्धनाच्या उपाययोजना, पीक संरक्षण तसेच महिला शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला नगाव खुर्दच्या सरपंच सरला चंद्रकांत जगदाळे यांच्यासह गावातील शेतकरी, महिला शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनिल उमराव बोरसे व अनिल भिला बोरसे यांनी विशेष सहकार्य केले. ग्रामपंचायत अधिकारी पवनकुमार वाघ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
![]()

