१५ दिवसांची मुदत संपल्यानंतर दुकाने खाली करून घेण्याची प्रक्रिया सुरू होण्याचे संकेत; नवीन लिलाव प्रक्रियेची तयारी…
प्रतिनिधी | अमळनेर : अमळनेर नगरपरिषदेच्या मालकीच्या सुमारे १२०० व्यापारी गाळ्यांच्या भाडेकरूंना पालिकेने दुकाने खाली करण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत. नोटिसीत दिलेली १५ दिवसांची मुदत संपली असल्याने दुकाने खाली करून घेण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे संकेत पालिकेकडून देण्यात आले आहेत. मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी नवीन लिलाव प्रक्रिया राबवण्यासाठी भाडे ठरवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती दिली.
नगरपरिषदेच्या मालकीच्या दुकानांचे तीन वर्षांपर्यंतचे भाडेकरार संपल्यानंतरही अनेक भाडेकरू वर्षानुवर्षे दुकाने सोडत नाहीत, अशी माहिती पालिकेने दिली. नवीन कायद्यानुसार शहरातील पालिका मालकीचे १२०० व्यापाऱ्यांची दुकाने खाली करण्याच्या नोटिसा दिल्या असून थकबाकीची रक्कमही वसूल करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त तीन वर्षे मुदत वाढवता येते, मात्र काही दुकानदारांनी लहान ते मोठ्या स्वरूपात भाडे ठेवून आणि न भरल्याने अनामत रक्कम जप्त केली जाणार आहे. काही जण दुकाने भाडेतत्त्वावर देऊन जादा भाडे घेत असल्याचा आरोपही पालिकेने केला आहे. यामुळे पालिकेचे नुकसान होत असल्याचे सांगण्यात आले.
मालमत्ता हस्तांतरण कायदा २०२५ नुसार मुदत संपलेल्या भाडेकरूंची दुकाने खाली करून नवीन लिलाव प्रक्रियेने अधिकृतपणे भाडे आकारण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी, सहाय्यक संचालक नगररचना, मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम अभियंता, तसेच आयुक्त नगरविकास अशा पाच सदस्यांची समिती भाडे निश्चित करणार आहे. ३० वर्षांसाठी किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी लिलाव प्रक्रिया राबवली जाणार असून, यानंतर दुकाने देण्यात येतील. शासन नियमानुसार अंमलबजावणी सुरू असून व्यापाऱ्यांच्या मदतीसाठी शासन स्तरावर प्रस्ताव पाठवून सकारात्मक विचार केला जाईल, असे लोकयुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी सांगितले.
![]()

