१४ व १७ वर्षांखालील मुलींच्या संघांचे दुहेरी विजेतेपद; तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांच्या हस्ते खेळाडूंचा सन्मान…
प्रतिनिधी | अमळनेर : नामांकित खान्देश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौ. रा. कन्या शाळेच्या मुलींनी शासकीय शालेय कबड्डी स्पर्धेत १४ व १७ वर्षांखालील अशा दोन्ही वयोगटांत विजेतेपद पटकावून घवघवीत यश संपादन केले. अंतिम सामन्यांत १४ वर्षांखालील संघाने ललिता पाटील स्कूल, तर १७ वर्षांखालील संघाने आश्रमशाळा रणाईचे यांच्यावर मात केली. या यशामुळे दोन्ही संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या आयोजनातून ही स्पर्धा पार पडली. दोन्ही गटांतील खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळ, चपळाई आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांवर मात करत शाळेला दुहेरी विजेतेपद मिळवून दिले. आता जिल्हास्तरीय स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे होणार असून, या स्पर्धेतही आपली कामगिरी उंचावण्याचे आव्हान खेळाडूंसमोर असेल.
१४ वर्षांखालील संघाचे नेतृत्व जिंकरा शेख शाकिर हिने केले. या संघात भैरवी पाटील, कृतीका वाडेकर, आराध्या पाटील, श्रावणी साळुंखे, लावण्या पाटील, दिव्या पाटील, कावेरी अहिरे, हिमानी पाटील आणि रीदा फातेमा सादिक यांचा समावेश होता.
१७ वर्षांखालील संघाचे नेतृत्व अश्मिरा शाकिर शेख हिने केले. या संघात कावेरी पाटील, पुनवी निकम, कल्याणी पारधी, केतकी देशपांडे, इशा पाटील, मयुरी पवार, लीना गुरव, कामिनी सोनवणे, वैष्णवी पाटील, समीक्षा जाधव, रिशिका गोयल, स्नेहल पाटील आणि मोनिका भोई या खेळाडूंनी सहभाग घेतला.
दोन्ही विजयी संघांचा अमळनेरच्या तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांच्या हस्ते विजयी चषक व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या यशाबद्दल शालेय समितीचे चेअरमन भाऊसाहेब जितेंद्र जैन, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक एस. आर. शिंगाणे, पर्यवेक्षक एस. पी. वाघ, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी, कार्यालय प्रमुख शाम पवार, एस. एस. माळी, आर. एस. सोनवणे आणि किरण सनेर यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. क्रीडा विभागप्रमुख सौ. आर. एस. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी सराव व मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले.
![]()

