तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार; पती-पत्नीकडून जीवे मारण्याची धमकी…
प्रतिनिधी | अमळनेर : शिटी का मारली, असा जाब विचारल्याचा राग आल्याने तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता गांधलीपुरा येथे घडली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या तरुणाच्या आई व पत्नीलाही मारहाण करण्यात आली.
याप्रकरणी अजय दगडू विसावे (रा. कोष्टीवाडा, गांधलीपुरा) यांच्या फिर्यादीवरून रोहित मरसाळे व त्याची पत्नी पूजा मरसाळे यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अजय यांनी रोहितला शिटी मारण्याबाबत जाब विचारला असता, त्याने शिवीगाळ करत लोखंडी रॉडने डोक्यावर वार केल्याचा आरोप आहे. यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या अजय यांच्या आई कलाबाई व पत्नी राधा यांनाही पूजा हिने चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दोघांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी भारतीय न्यायसंहितेच्या कलम ११८(१), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल असून, पुढील तपास हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.
![]()

