पोटाच्या विकारावर शस्त्रक्रियेनंतरही त्रास कायम; साडीने पंख्याला गळफास घेऊन जीवन संपवले…
प्रतिनिधी | अमळनेर : अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील जयश्री रमाकांत पाटील (वय ३४) या विवाहितेने पोटाच्या विकाराला कंटाळून साडीने पंख्याला गळफास घेत दिनांक २१ रोजी आत्महत्या केली. ही घटना नाशिक येथे घडली. गेल्या दोन वर्षांपासून त्या पोटाच्या विकाराने त्रस्त होत्या आणि शस्त्रक्रिया होऊनही त्रास कमी होत नव्हता.
पती रमाकांत भगवान पाटील हे खाजगी कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करतात. पती कामावर गेल्यानंतर दुपारी ३ वाजता जयश्री यांनी हे पाऊल उचलले. घटनेच्या दिवशी त्यांचा लहान मुलगा शाळेतून घरी आला आणि दरवाजा उघडल्यावर आईला पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून त्याने हंबरडा फोडला. आवाज ऐकून जवळच्या महिलांनी धाव घेतली आणि पती रमाकांत यांना फोनवरून घटनेची माहिती दिली. त्यानंतर जयश्री यांना खाली उतरवून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
जयश्री यांचे माहेर चोपडा तालुक्यातील धनवाडी येथे आहे. नाशिक येथे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह पाडळसरे गावी आणण्यात आला आणि दिनांक २२ रोजी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. जयश्री या स्वतःच्या त्रासात जीवन जगून पतीला कर्जाच्या खाईत लोटण्यापेक्षा मृत्यूला कवटाळणे बरे, असे जवळच्या महिलांकडे बोलून दाखवत असत. या घटनेने पाडळसरे गावावर शोककळा पसरली असून गावातील कोणाच्याही घरात चूल पेटली नाही.
![]()

