अमळनेर नगरपरिषदेच्या तपासणी मोहिमेत कारवाई; एक नागरिक पाणी वाया घालवताना आढळला, पालिकेकडून पंचनामा…
प्रतिनिधी | अमळनेर : शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी अमळनेर नगरपरिषदेने सुरू केलेल्या अवैध नळजोडणी तपासणी मोहिमेत २२ ऑक्टोबर रोजी राजाराम नगर परिसरात तीन ठिकाणी अवैध नळजोडण्या आढळून आल्या. तसेच, एक नागरिक पाणी वाया घालवत असल्याचे निदर्शनास आले. संबंधित प्रकरणांमध्ये नगरपरिषदेच्या पथकाने पंचनामा केला असून, अवैध नळजोडण्या नियमित करण्यासह पाण्याचा गैरवापर रोखण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.
दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी, शहरातील नागरिकांना समसमान पाणीपुरवठा व्हावा आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा, या उद्देशाने नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर आणि मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. अवैध नळजोडण्या शोधून संबंधितांकडून नियमानुसार दंडात्मक रक्कम आणि एक वर्षाची आगाऊ पाणीपट्टी वसूल करून जोडण्या नियमित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, एकाच पाणीपट्टीवर दुहेरी नळजोडणीचा लाभ घेणाऱ्यांचा शोध घेऊन अतिरिक्त जोडण्या बंद करण्याची कार्यवाही केली जात आहे.
या मोहिमेअंतर्गत २२ ऑक्टोबर रोजी पाणीपुरवठा अभियंता सत्येम पाटील, विजय विसावे, पाळी अभियंता राजेंद्र हडपे, गणेश पाटील, कमरोद्दीन शेख आणि व्हॉलमन परेश उदेवाल यांच्या पथकाने राजाराम नगर परिसरात तपासणी केली. या वेळी दाऊद पिंजारी, भानुदास त्र्यंबक पाटील आणि रवींद्र फकिरा थोरात यांच्याकडे प्रत्येकी दोन नळजोडण्या आढळून आल्याची माहिती नगरपरिषदेकडून देण्यात आली. या प्रकरणांचा पथकाने पंचनामा केला. तपासणीदरम्यान काही व्यक्तींनी पथकाच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याची नोंदही नगरपरिषदेने पंचनाम्यात केल्याचे सांगण्यात आले.
याच तपासणीदरम्यान कमलेश पाटील हे पाणी वाया घालत असल्याचेही पथकाच्या निदर्शनास आले. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नागरिकांनी नळाला पाणी आल्यानंतर त्याचा आवश्यक तेवढाच वापर करावा, पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा आणि अवैध नळजोडण्या नियमित करून घ्याव्यात, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
नागरिकांनी तपासणी पथकाला सहकार्य करावे : सत्येम पाटील
शहरातील सर्व नागरिकांना समसमान पाणीपुरवठा व्हावा, यासाठी पाणी बचत करणे आवश्यक आहे. नागरिकांनी अवैध नळजोडण्या बंद करून नियमानुसार अधिकृत जोडण्या घ्याव्यात आणि तपासणीसाठी येणाऱ्या पथकाला सहकार्य करावे, असे आवाहन अमळनेर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सत्येम पाटील यांनी केले.
अवैध नळजोडणीविरोधातील मोहीम सुरूच राहणार : मुख्याधिकारी गणेश शिंदे
शहरातील अवैध नळजोडण्या शोधणे आणि पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठीची मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. नागरिकांनी तपासणी पथकासोबत विनाकारण हुज्जत न घालता सहकार्य करावे. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाण्याचा अपव्यय रोखणे आवश्यक असून, प्रत्येक नागरिकाने पाणी बचतीची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले.
![]()

