धुळे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू; अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद…
प्रतिनिधी | अमळनेर : मुंग्या मारण्याची पावडर पाण्यात टाकून प्यायल्याने गांधलीपुरा येथील रमेश तुळशीराम पवार (वय ४३) यांचा धुळे येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील पुढील तपास करीत आहेत.
ही घटना १३ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ११:४५ वाजता घडली. रमेश पवार यांनी राहत्या घरी मुंग्या मारण्याचे पावडर पाण्यात टाकून प्यायले होते. त्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने ते पळत गांधलीपुरा चौकात आले.
चौकात आल्यावर त्यांनी चुलत भाऊ दिनेश पंडित पवार यांना सांगितले की, “मला मोटारसायकलवर घरी सोड, मी मुंग्यांचे पावडर प्यायलो आहे.” तेव्हा दिनेश यांनी तातडीने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांची गंभीर परिस्थिती पाहून त्यांना १०८ रुग्णवाहिकेने धुळे येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
दिनेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

