आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन…
प्रतिनिधी | अमळनेर : पंचायत समिती अमळनेर आणि शिरसाळे येथील भिका यशोद चौधरी माध्यमिक विद्यालय व हिरामण जीवन पाटील कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, २३ ऑक्टोबर रोजी शिरसाळे येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते होणार असून, तालुक्यातील विद्यार्थ्यांना आपल्या वैज्ञानिक कल्पना, प्रयोग आणि उपकरणे सादर करण्याची संधी मिळणार आहे. दुपारी चार वाजता बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.
विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन संजय शिरोडे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून खासदार स्मिता वाघ, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, निलेश पाटील, डॉ. अनिल झोपे, डॉ. चंद्रकांत साळुंखे, रागिणी चव्हाण, नरेंद्र चौधरी, सचिन परदेशी, एजाज शेख, प्रतिमा सानप, विजय सरोदे, कविता सुर्वे, कविता चव्हाण, प्रमोद पाटील आणि रावसाहेब पाटील उपस्थित राहणार आहेत.
प्रदर्शनात लहान गट, मोठा गट, शिक्षक गट आणि शिक्षकेतर गट अशा चार गटांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही आपली वैज्ञानिक उपकरणे व प्रयोग सादर करता येणार आहेत.
प्रदर्शनासाठी उपकरणे सादर करणे आणि शाळेच्या आवश्यक नोंदी करण्याची प्रक्रिया भिका यशोद चौधरी माध्यमिक विद्यालयात सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. विविध गटांतील सहभागींच्या उपकरणांचे सादरीकरण आणि प्रदर्शन पाहण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे.
बक्षीस वितरण समारंभाला उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, तहसीलदार डॉ. उमा ढेकळे, मुख्याधिकारी गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम आणि सहायक पोलीस निरीक्षक साजिद मन्सूरी उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शनातील यशस्वी सहभागींचा गौरव करण्यात येणार आहे.
तालुक्यातील सर्व माध्यमिक व प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी तसेच विज्ञान आणि गणित विषयांच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे. शाळांनी वैज्ञानिक उपकरणे सादर करावीत आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रदर्शन पाहण्यासाठी आणावे, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे आणि मुख्याध्यापक प्रवीण पवार यांनी केले आहे.
![]()

