आमदार अनिल पाटील व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न; अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजन…
प्रतिनिधी | अमळनेर : अमळनेर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात, सांची स्तूपाच्या तोरणद्वाराच्या धर्तीवर उभारण्यात येणाऱ्या भव्य प्रवेशद्वाराचा दिमाखदार भूमिपूजन सोहळा मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी, सायंकाळी आमदार अनिल पाटील आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हा शहरातील सामाजिक आणि वैचारिकदृष्ट्या महत्त्वाचा परिसर आहे. या चौकात सांची स्तूपाच्या धर्तीवर भव्य प्रवेशद्वार उभारण्याच्या उपक्रमामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच बौद्ध स्थापत्यकलेची वैशिष्ट्यपूर्ण ओळख अधोरेखित होणार आहे.
अशोक विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन हा भारतीय बौद्ध समाजासाठी ऐतिहासिक व प्रेरणादायी दिवस मानला जातो. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या भूमिपूजन सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद, सिद्धार्थ व्यायाम शाळा, अमळनेर आणि समस्त बौद्ध बांधव अमळनेर शहर-तालुका यांच्यामार्फत या सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाला आमदार अनिल पाटील आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्यासह नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, शहरातील नागरिक, महिला व विशेषतः बौद्ध बांधव आणि आंबेडकरी अनुयायांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()

