नवबौद्ध मित्र मंडळाच्या वतीने आयोजन; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक धम्मदीक्षेच्या स्मृतींना उजाळा…
प्रतिनिधी | सारबेटे खुर्द, अमळनेर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन सामाजिक समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवतेचा संदेश दिला. या ऐतिहासिक धम्मक्रांतीच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी सारबेटे खुर्द येथे नवबौद्ध मित्र मंडळाच्या वतीने ७० वा धम्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने बुद्ध, धम्म आणि संघ यांच्या विचारांप्रती आदर व्यक्त करत धम्मचक्र परिवर्तनाच्या ऐतिहासिक महत्त्वाचे स्मरण करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यांच्या या ऐतिहासिक निर्णयाने भारतीय समाजाच्या परिवर्तनाच्या वाटचालीत नवा अध्याय सुरू झाला. विषमता, जातिभेद आणि सामाजिक अन्यायाच्या विरोधात उभे राहत त्यांनी समता, विवेक, करुणा आणि बंधुता यांवर आधारित जीवनमार्गाचा स्वीकार केला. त्यांच्या धम्मदीक्षेमुळे लाखो अनुयायांना स्वाभिमानाने आणि समानतेच्या मूल्यांवर आधारित जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली.
धम्मचक्र परिवर्तन दिन हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक आणि वैचारिक परिवर्तनाची आठवण करून देणारा महत्त्वपूर्ण दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करून समाजाला अंधश्रद्धा, विषमता आणि अन्यायापासून दूर जात विवेकनिष्ठ जीवनपद्धतीचा मार्ग दाखविला.
सारबेटे खुर्द येथील नवबौद्ध मित्र मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विशाल ब्रह्मे, अनिकेत ब्रह्मे, महेश ब्रह्मे, संदीप ब्रह्मे, जयेश ब्रह्मे, मयूर ब्रह्मे, राकेश ब्रह्मे, अशोक ब्रह्मे, प्रशांत बिऱ्हाड, अविनाश बनसोडे, किशोर भालेराव, विजय ब्रह्मे, भावेश ब्रह्मे आणि गणेश ब्रह्मे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
![]()

