नांदगाव रस्त्यालगतची घटना; आजूबाजूच्या मका पिकासह कुरणाला आग पसरण्याचा धोका टळला…
प्रतिनिधी | अमळनेर : अमळनेर शहरातील नांदगाव रस्त्यालगत असलेल्या मक्याच्या शेताला सोमवारी (दि. १९ ऑक्टोबर) सकाळी सुमारे १० वाजता आग लागली. स्थानिक नगरसेवक मुक्तार खाटीक यांनी या घटनेची माहिती नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाचे अधिकारी गणेश गोसावी यांना दिल्यानंतर त्यांनी संबंधित अग्निशमन दलाचे कर्मचाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पाठवले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आली आणि संभाव्य अनर्थ टळला.
प्रकाश नवलं पाटील, ज्ञानेश्वर बळीराम पाटील आणि सुधाकर काशिनाथ पाटील यांच्या मक्याच्या शेतात ही आग लागली होती. घटनास्थळाच्या आजूबाजूला मका पिकासह कुरण असल्याने आग पसरण्याचा धोका निर्माण झाला होता.
अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आग विझविण्याची कार्यवाही केली. कर्मचाऱ्यांनी प्रयत्नपूर्वक आग पूर्णपणे आटोक्यात आणली. या मोहिमेत वाहनचालक सत्येन संदानशिव आणि फायरमन मच्छिंद्र चौधरी यांनी सहभाग घेतला. अग्निशमन दलाने वेळीच केलेल्या कार्यवाहीमुळे परिसरातील इतर पिकांना आग पसरण्याचा संभाव्य धोका टळला.
![]()

