पाणीपुरवठा बंद होईपर्यंत गळती कायम; केवळ पाहणी नको, नगरपरिषद प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, नागरिकांची मागणी…
प्रतिनिधी | अमळनेर : शहरातील पारोळा रस्त्यालगत असलेल्या साई गजानन एरियातील खालच्या भागात मागील एक महिन्यापासून पाणीगळती सुरू असून, यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे. ही समस्या नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली होती. मात्र, त्यानंतरही पाणीगळती रोखण्यासाठी प्रत्यक्ष कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या परिसरात नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला की पाइपलाइनमधून पाणीगळती सुरू होते. पाणीपुरवठा बंद होईपर्यंत ही गळती सुरूच राहत असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. एकीकडे पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जाते, तर दुसरीकडे पाइपलाइनमधील गळतीमुळे पिण्याचे पाणी वाया जात असल्याचे चित्र या परिसरात दिसत आहे.
स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत नगरपरिषदेला यापूर्वीच कळविले होते. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी पाहणी करण्यासाठी आले होते. मात्र, पाहणीनंतरही दुरुस्तीचे काम झाले नसल्याने समस्या अद्याप कायम आहे. त्यामुळे केवळ पाहणी न करता प्रत्यक्ष दुरुस्ती करून पाणीगळती कायमस्वरूपी थांबविण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
साई गजानन एरियातील खालच्या भागात वारंवार होणारी पाणीगळती लक्षात घेता, नगरपरिषदेने संबंधित पाइपलाइनची तातडीने दुरुस्ती करावी. तसेच, जुनी किंवा खराब झालेली पाइपलाइन बदलून त्या ठिकाणी नवीन पाइपलाइन टाकावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पाण्याचा अपव्यय थांबविण्यासाठी आणि नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा मिळण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
![]()

