सेवा संकल्प अभियानात शिधापत्रिका, महसुली दाखले, सामाजिक अर्थसहाय्य आणि आरोग्यविषयक योजनांचे वितरण…
प्रतिनिधी | अमळनेर : शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजू आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत सहजपणे पोहोचविण्यासाठी राबविण्यात आलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत अमळनेर तालुक्यातील सुमारे ९६० लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ देण्यात आले. इंदिरा भुवन येथे १६ ऑक्टोबर रोजी आयोजित या अभियानात शिधापत्रिका, सामाजिक अर्थसहाय्य योजना, महसुली दाखले, आधार सेवा, कृषीविषयक सुविधा, आरोग्यविषयक लाभ आणि अन्य शासकीय सेवांचे वितरण करण्यात आले. या अभियानामुळे नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविणे सुलभ होत असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घटनात्मक पदावरील २५ वर्षांच्या प्रवासानिमित्त १६ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत अमळनेर तालुक्यातील विविध शासकीय विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी इंदिरा भुवन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना जयश्री पाटील म्हणाल्या की, प्रशासन जनसेवेसाठी तत्पर असून शासकीय कामकाज अधिक गतिमान होत आहे. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचे लाभ प्रत्यक्ष पोहोचत आहेत. मात्र, जुन्या नोंदी उपलब्ध नसल्यामुळे काही नागरिकांना वयाचे दाखले मिळविताना अडचणींचा सामना करावा लागतो. अशा प्रकरणांमध्ये शासनाने पर्यायी मार्ग उपलब्ध करून देत ऑफलाइन पद्धतीने दाखले मिळविण्याची सुविधा द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. शासकीय योजनांचा लाभ घेताना कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवल्यास नागरिकांनी संबंधित प्रशासनाशी किंवा आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या अभियानांतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेशी संबंधित सेवांमध्ये २२ नवीन शिधापत्रिका, आठ दुबार शिधापत्रिका आणि १८ शिधापत्रिकांमधून नावे कमी करण्याची कार्यवाही करण्यात आली. तसेच ५५० धान्य लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. सामाजिक अर्थसहाय्य योजनांमध्ये राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे सहा धनादेश वितरित करण्यात आले. याशिवाय ११० लाभार्थ्यांना संजय गांधी योजना, २२ लाभार्थ्यांना इंदिरा गांधी योजना आणि २४ लाभार्थ्यांना श्रावणबाळ योजनेचा लाभ देण्यात आला. एकूण ८० हयात प्रमाणपत्रे देण्यात आली, तर ३५ लाभार्थ्यांची थेट लाभ हस्तांतरणाची (डीबीटी) प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
महसूल आणि भूमिअभिलेख विभागामार्फत १३४ फेरफार प्रकरणे निकाली काढण्यात आली. सातबारा उताऱ्यांतील दुरुस्तीची १४ प्रकरणे आणि आठ-अ उताऱ्यांशी संबंधित आठ प्रकरणांवर कार्यवाही करण्यात आली. तसेच ८४ लाभार्थ्यांना सातबारा उताऱ्यांचे वितरण करण्यात आले. याशिवाय ४९ उत्पन्नाचे दाखले, १९ राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रे, ४१ रहिवासी प्रमाणपत्रे आणि १६ जातीच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
इतर विभागांच्या माध्यमातून आठ नागरिकांची आधार नोंदणी, सहा आधार दुरुस्त्या, ५० लाभार्थ्यांना बेबी किट, १२ विविध प्रकारचे खाद्य नमुने, आठ महिला बचत गटांना संबंधित लाभ, चार लाभार्थ्यांना अवजारांचे वाटप आणि ४९ महिलांना शेतकरी प्रमाणपत्रे देण्यात आली. तसेच दहा नागरिकांना नवीन वीजजोडण्या, २६ लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड, ६० महिलांना मोफत प्रवास पास, २६ लाभार्थ्यांची बचत खाती आणि आठ महिलांना सन्मान निधीचा लाभ देण्यात आला. याशिवाय एका लाभार्थ्याशी संबंधित मुद्रांक शुल्काची कार्यवाही आणि दहा लाभार्थ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. विविध विभागांच्या समन्वयातून या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.
कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार डॉ. उमा ढेकळे, निवासी नायब तहसीलदार सी. यू. पाटील, तालुका कृषी अधिकारी सी. आर. ठाकरे, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रेमलता पाटील, भूमिअभिलेख उपअधीक्षक सीमा गावित, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, नायब तहसीलदार अजय कुलकर्णी आणि पुरवठा निरीक्षण अधिकारी रुकसाना शेख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन संजय पाटील यांनी केले. अभियानाच्या यशस्वितेसाठी मंडळाधिकारी नरेंद्रकुमार धनराळे, ग्राम महसूल अधिकारी अशपाक पिंजारी, जगदीश पाटील, विद्या पाटील, दीपक बोरसे, सूर्यवंशी आणि सचिन निकम यांनी सहकार्य केले.
![]()

