तांबेपुरा-अंतुर्ली रस्त्यावरील वनविभागाच्या पिंजऱ्यात पहाटे अडकला; वनविभागासह स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नांना यश…
प्रतिनिधी | अमळनेर : अंतुर्ली, रंजाणे आणि परिसरातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. गुरुवारी (दि. १६ ऑक्टोबर) पहाटेच्या सुमारास तांबेपुरा ते अंतुर्ली रस्त्यावरील पिंजारी मुस्लिम स्मशानभूमीजवळ लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. बिबट्या पकडल्याची माहिती परिसरात पसरताच शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
अंतुर्ली आणि रंजाणे शिवारात या बिबट्याने चार ते पाच पाळीव प्राण्यांची शिकार केल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे शेतात कामासाठी जाणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे, शेतातील जनावरांची देखभाल करणे आणि शिवारात काम करणे याबाबत नागरिकांमध्ये चिंता होती. शिरूड, मंगरूळ, पिंपळे, ढेकू, धार रस्ता, ताडेपुरा आणि टाकरखेडा परिसरातही बिबट्याचा वावर दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये सतर्कतेचे वातावरण होते.
बिबट्या वारंवार ठिकाण बदलत असल्याने त्याला पकडण्याचे वनविभागासमोर आव्हान होते. मात्र, वनपरिक्षेत्र अधिकारी छत्रपती चव्हाण, उपवनसंरक्षक राम धोत्रे आणि सहाय्यक वनसंरक्षक अमोल पंडित यांच्या सूचनेनुसार वनविभागाने विविध मोक्याच्या ठिकाणी पिंजरे लावून नियोजनबद्ध मोहीम राबवली. बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेत पिंजऱ्यांची ठिकाणे निश्चित करण्यात आली. वनविभागाच्या पथकाने रात्रंदिवस गस्त घालून परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवले. या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर अखेर बिबट्या पिंजऱ्यात अडकला.
या मोहिमेत वनपाल गुलाब पिंजारी, वनरक्षक दुर्गादास वानखेडे, योगेश पाटील, मनीषा मोरे तसेच वनमजूर प्रवीण पाटील, समाधान पाटील आणि मयूर पाटील यांनी सहभाग घेतला. बिबट्याच्या वावरावर लक्ष ठेवण्यापासून ते पिंजऱ्यांच्या ठिकाणांचे नियोजन करण्यापर्यंत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
बिबट्याला जेरबंद करण्याच्या मोहिमेत स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनीही सहकार्य केले. माजी नगरसेवक मुख्तार खाटीक यांनी पिंजऱ्यात आमिष म्हणून बकऱ्यांची व्यवस्था करून दिली, तर सरपंच सचिन पाटील यांनी वनविभागाच्या पथकाला मदत केली. वनविभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिक यांच्या समन्वयातून ही मोहीम यशस्वी झाली.
बिबट्या जेरबंद झाल्याने अंतुर्ली, रंजाणे आणि लगतच्या परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, नागरिकांनी अद्यापही सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. बिबट्या किंवा अन्य वन्यप्राणी आढळल्यास त्याच्या जवळ जाण्याचा, त्याला घेरण्याचा किंवा स्वतःहून पकडण्याचा प्रयत्न न करता तातडीने वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
![]()

