वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थिनींचा उपक्रम; नियमित वाचनाचा संकल्प…
प्रतिनिधी | अमळनेर : खान्देश शिक्षण मंडळ संचलित डी. आर. कन्या शाळेत भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन सकाळ व दुपार अशा दोन्ही विभागांत उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थिनींनी वाचनाचे महत्त्व जाणून घेत नियमित वाचन करण्याची शपथ घेतली. प्रमुख वक्त्यांनी डॉ. कलाम यांचे कार्य, क्षेपणास्त्र तंत्रज्ञानातील भारताची प्रगती आणि वैज्ञानिक क्षेत्रातील योगदान याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, तर उपमुख्याध्यापक श्री. एस. आर. शिंगणे उपस्थित होते. व्यासपीठावर पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी, श्रीमती आर. एस. सोनवणे, श्रीमती एस. एस. देवरे, श्री. एस. एस. माळी, ज्येष्ठ लिपिक श्री. शाम पवार आदी मान्यवर उपस्थित होते. सकाळ विभागासाठी प्रमुख वक्त्या म्हणून श्रीमती व्ही. एम. पाटील, तर दुपार विभागासाठी श्री. के. पी. सनेर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी वक्त्यांनी डॉ. कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचा गौरव करत त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, संशोधनातील योगदानाचा आणि भारताच्या क्षेपणास्त्र विकासातील भूमिकेचा आढावा घेतला. त्यांच्या जीवनातून विद्यार्थिनींनी जिज्ञासा, ज्ञानसाधना आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थिनींनी वाचन उपक्रमात सहभाग घेतला. वाचनामुळे ज्ञानात भर पडते, विचारशक्ती विकसित होते आणि व्यक्तिमत्त्व घडण्यास मदत होते, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. विद्यार्थिनींनी नियमित वाचन करण्याची शपथ घेत वाचनाची सवय आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
![]()

