अनुलोम, पशुसंवर्धन विभाग आणि मंगळग्रह सेवा संस्थेचा संयुक्त उपक्रम; आधुनिक पशुपालन, दुग्धव्यवसाय व शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन…
प्रतिनिधी | अमळनेर : पशुपालन, दुग्धव्यवसाय, शेळीपालन आणि कुक्कुटपालनाच्या माध्यमातून उत्पन्नवाढीच्या संधी उपलब्ध करून देण्यासह शासनाच्या विविध योजनांची माहिती पशुपालकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित पशुसंवर्धन व पशुधन विकास कार्यशाळेला सहाशेहून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम), पशुसंवर्धन विभाग, अमळनेर आणि मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी श्री मंगळग्रह मंदिरात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पशुपालनाचे आधुनिक तंत्रज्ञान, पशुधन आरोग्य व्यवस्थापन आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
ग्रामीण भागातील नागरिकांना पशुसंवर्धन क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी, पशुधनाच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया समजावी, हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. यावेळी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेसाठी अर्ज करताना आवश्यक असलेल्या प्रशिक्षण प्रमाणपत्रांचेही वाटप करण्यात आले. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे पॉवरपॉइंट सादरीकरण दाखविण्यात आले.
जळगाव जिल्ह्यात सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पशुसंवर्धनविषयक शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उपक्रमांतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अनुलोम संस्थेमार्फत शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यशाळेमुळे पशुपालकांना उपलब्ध योजनांची माहिती, आधुनिक पशुपालन पद्धती आणि पशुधन विकासाच्या विविध पर्यायांविषयी मार्गदर्शन मिळाले.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेस डॉ. संजय कुवर, डॉ. समाधान पाटील, डॉ. संदेश वाटोळे, डॉ. दीपक पाटील, डॉ. कल्याण थोरात आणि निलेश राजपूत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. अनुलोमचे जळगाव उपविभाग जनसेवक प्रवीण दांडगे, विभाग कार्यकर्ते विनोद माळी, जळगाव उपविभाग संवादिनी सौ. नयनाताई पाटील, डॉ. मनोहर सोनवणे, राहुल पाटील, सौ. भाविकाताई पाठक, सौ. संगीताताई पाटील, घनश्याम पाटील, वीरभूषण, शैलेश पाटील, विजय पाटील, अमर सोनार आणि एकनाथ जाधव यांनीही सहभाग नोंदविला.
पशुसंवर्धन क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती, शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्रमाणपत्रांचे वाटप यांमुळे ही कार्यशाळा पशुपालकांसाठी उपयुक्त ठरली. ग्रामीण भागातील नागरिकांना पशुधन विकासाच्या माध्यमातून आर्थिक प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व या कार्यशाळेतून अधोरेखित झाले.
![]()

