मोटारसायकल अडवून चावी काढल्याचा, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा व ‘खंडणीखोर पत्रकार’ संबोधून बदनामी केल्याचा आरोप…
प्रतिनिधी | अमळनेर : अमळनेर येथे द लोक न्यूज या वेब पोर्टलचे मुख्य संपादक संभाजी सुकलाल देवरे यांनी महेंद्र शालीग्राम बोरसे यांच्याविरुद्ध मोटारसायकल अडवून चावी काढणे, शिवीगाळ करणे, जीवे मारण्याची धमकी देणे आणि सार्वजनिक ठिकाणी बदनामी केल्याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ ते ६.३० वाजण्याच्या दरम्यान संभाजी देवरे हे मोटारसायकलने जात असताना शहरातील न्यू प्लॉट परिसरात बजरंग बन्सीलाल अग्रवाल यांच्या घरासमोर संबंधित व्यक्तीने मोटारसायकलने त्यांचा रस्ता अडविला. त्यानंतर त्यांच्या वाहनाची चावी काढून घेत शिवीगाळ करण्यात आली, तसेच जीवे मारण्याची धमकी देत अंगावर धावून येऊन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देवरे यांनी केला आहे.
या घटनेदरम्यान संबंधित व्यक्तीने आपल्याला सार्वजनिक ठिकाणी ‘खंडणीखोर पत्रकार’ असे संबोधले आणि सोबत असलेल्या एका व्यक्तीला संभाषणाचे चित्रीकरण करण्यास सांगितले, असेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारामुळे आपली सार्वजनिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. घटनास्थळी सुमारे ३० ते ४० लोकांची गर्दी जमल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी देवरे यांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १२७(२), ३५१(२), १५२ व ३५६(२) तसेच महाराष्ट्र प्रसार माध्यमातील व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी प्रतिबंध) अधिनियम, २०१७ च्या कलम ३ व ४ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी, अशी विनंती त्यांनी पोलिसांना केली आहे.
या तक्रारीची प्रत जळगावचे पोलीस अधीक्षक आणि अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनाही पाठविण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, तक्रारीतील आरोपांची स्वतंत्र पडताळणी आणि पोलिसांच्या तपासातून होणारी निष्पत्ती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
![]()

