हेक्टरी एक लाख रुपये अनुदान द्या, एसआयआर रद्द करा; तहसील कार्यालयावर मोर्चा…
प्रतिनिधी | अमळनेर : अमळनेर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकरी व शेतमजुरांचे प्रश्न, वाढती बेरोजगारी, पेपरफुटी आणि एसआयआर प्रक्रियेविरोधात महाविकास आघाडीतर्फे गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता बेधील महाराणा प्रताप चौकात जनआंदोलन करण्यात येणार आहे. राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झालेली असतानाही सरकारकडून अद्याप कोणतीही मदत मिळालेली नसल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे.
तालुक्यातील शेतकरी व शेतमजूर अस्वस्थ झाले आहेत. आर्थिक संकटामुळे ते उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असून, दुष्काळग्रस्तांना सरकारकडून सरकारी यंत्रणांचा वापर पक्षीय व वैयक्तिक लाभासाठी केला जात असल्याचाही आरोप आघाडीने केला आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये अनुदान देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी आंदोलनातून करण्यात येणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राबविल्या जाणाऱ्या एसआयआर (मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण) प्रक्रियेमुळे मतदार त्रस्त असून, केंद्र व राज्य सरकारने ही प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी आघाडीने केली आहे. पेपरफुटी, बेरोजगारी तसेच शासकीय भरतीतील गैरप्रकारांच्या मुद्द्यांवरही आंदोलनात आवाज उठवला जाणार आहे.
या जनआंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून केले जाणार आहे. आंदोलनात महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, तरुण आणि माता-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे.
![]()

