नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाची विशेष तपासणी मोहीम; पाच व्यावसायिक आस्थापनांची तपासणी, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा…
प्रतिनिधी | अमळनेर : प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर, साठवणूक आणि विक्रीविरोधात अमळनेर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने १३ ऑक्टोबर रोजी विशेष तपासणी मोहीम राबवून १७५ किलो प्लास्टिक जप्त केले. या मोहिमेदरम्यान प्लास्टिक बंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन व्यावसायिक आस्थापनांना एकूण १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. शहरातील व्यापारी व दुकानदारांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळावा, यासाठी नगरपरिषद प्रशासनाने तपासणी मोहीम तीव्र केली आहे.
मुख्याधिकारी गणेश कारबारी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत गुरुकृपा प्लास्टिक, कोमल हॉटेल, संजय प्लास्टिक, बाबा प्लास्टिक आणि अनिल एजन्सी या पाच व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यावेळी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आणि साठवणुकीबाबत पाहणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन आढळलेल्या दोन आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर एकूण १७५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
प्लास्टिक कचऱ्यामुळे नाले तुंबणे, परिसरात अस्वच्छता निर्माण होणे आणि पर्यावरणाची हानी होण्यासारख्या समस्या उद्भवतात. या पार्श्वभूमीवर शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्लास्टिकचा वापर, साठवणूक व विक्री टाळण्याचे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे. प्लास्टिकला पर्याय म्हणून पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करण्यावरही भर देण्यात आला आहे.
शहरातील व्यापारी आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये प्लास्टिक बंदीच्या नियमांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी यापुढेही अशा तपासणी मोहिमा राबविण्यात येणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
या मोहिमेत आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, संतोष जाधव, योगेश पवार, वाहनचालक बालकृष्ण जाधव, जया सरदार, सतीश बिराडे, आनंद संदानशिव, युनूस शेख, गणेश गडरी, शहर समन्वयक तसेच आरोग्य विभागातील इतर कर्मचारी सहभागी झाले होते.
अमळनेर शहर स्वच्छ, सुंदर व प्लास्टिकमुक्त ठेवण्यासाठी व्यापारी, दुकानदार आणि नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
![]()

