अनंत संदानशिव यांचा तत्पर पुढाकार; जीवाश्रयच्या पथकाकडून तातडीने उपचार…
प्रतिनिधी | अमळनेर : रस्त्यावर अपघातग्रस्त अवस्थेत वेदनांनी विव्हळणाऱ्या जखमी कुत्र्याला अमळनेर नगरपरिषदेचे कर्मचारी अनंत संदानशिव यांच्या तत्परतेमुळे आणि जीवाश्रय ॲनिमल वेल्फेअर शेल्टरच्या पथकाने केलेल्या तातडीच्या उपचारांमुळे मदत मिळाली. पहाटे फरशी रोडवर निदर्शनास आलेल्या या घटनेत वेळीच मदत उपलब्ध झाल्याने एका मुक्या प्राण्याचे प्राण वाचविण्यात यश आले.
नगरपरिषदेचे कर्मचारी अनंत संदानशिव आणि अक्षय गढरे हे पहाटे फरशी रोडवर शतपावलीसाठी गेले असताना त्यांना गंभीर दुखापत झालेला कुत्रा रस्त्यावर आढळला. त्याची अवस्था पाहून संदानशिव यांनी क्षणाचाही विलंब न करता अमळनेर नगरपरिषद हद्दीत श्वानांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यासाठी नियुक्त असलेल्या जीवाश्रय ॲनिमल वेल्फेअर शेल्टरचे डॉ. यश पांचरिया यांच्याशी संपर्क साधला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. पांचरिया यांनी तातडीने आपल्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. पथकाने जखमी कुत्र्याला उपचारासाठी हलवून त्याच्यावर आवश्यक उपचार केले. त्यामुळे या मुक्या प्राण्याला वेळेत वैद्यकीय मदत मिळाली.
या घटनेतून प्राणिमात्रांप्रती संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. जखमी प्राणी दिसल्यानंतर केवळ हळहळ व्यक्त न करता त्याच्या मदतीसाठी तातडीने प्रयत्न करणे किती महत्त्वाचे आहे, हे या प्रसंगातून स्पष्ट झाले. अनंत संदानशिव यांनी दाखविलेली तत्परता आणि जीवाश्रयच्या पथकाने दिलेली तातडीची मदत यांचे परिसरातून कौतुक होत आहे.
माणुसकीची जाणीव केवळ माणसांपुरती मर्यादित न ठेवता मुक्या जीवांप्रतीही जपली पाहिजे, हा संदेश या घटनेतून अमळनेरकरांसमोर आला आहे.
![]()

