ॲड. ललिता पाटील सीबीएससी शाळेमागे मोबाईल टॉवरजवळ जेसीबीच्या खोदकामामुळे जलवाहिनी फुटल्याचा प्रकार; पाण्याची नासाडी थांबवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी…
प्रतिनिधी | अमळनेर : शहरातील ललिता मॅडम शाळेच्या मागील बाजूस, टॉवरजवळ नगरपरिषदेची पाणीपुरवठा पाइपलाइन फुटल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत आहे. संबंधित ठिकाणी खोदण्यात आलेल्या खड्ड्यामुळे पाइपलाइनचे नुकसान झाले असून, वाहून जाणारे पाणी रोखण्यासाठी नगरपरिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून पाइपलाइनची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
ॲड. ललिता पाटील सीबीएससी शाळेमागे मागील बाजूस, टॉवरजवळ खोदण्यात आलेला खड्डा आणि नगरपरिषदेची फुटलेली पाणीपुरवठा पाइपलाइन यांचा संबंध अवैध मुरूम उत्खनन व वाहतुकीशी असण्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. अवैधरीत्या मुरूम खोदणाऱ्या व त्याची वाहतूक करणाऱ्यांकडून जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करण्यात आले असावे आणि त्यातूनच पाइपलाइनचे नुकसान झाले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या प्रकारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याने नगरपरिषद प्रशासनाने घटनास्थळाची पाहणी करावी, तर संबंधित यंत्रणांनी मुरूम उत्खनन व वाहतुकीच्या वैधतेची तपासणी करून दोषींना जबाबदार धरावे, अशी मागणी होत आहे.
एकीकडे नगरपरिषदेत बैठका घेऊन नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन केले जात आहे. तसेच पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणी कपातीबाबत माहिती देऊन उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, दुसरीकडे नगरपरिषदेचीच पाइपलाइन फुटून पाण्याची नासाडी होत असल्याने पाणी बचतीच्या आवाहनाच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना अशा प्रकारे पाइपलाइनमधून पाणी वाहून जाणे ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने संबंधित ठिकाणी तातडीने पाहणी करून फुटलेली पाइपलाइन दुरुस्त करावी आणि भविष्यात खोदकाम करताना पाणीपुरवठा वाहिन्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
![]()

