साथीदाराच्या कबुलीवरून दुसरा आरोपी बलेडी गावातून ताब्यात…
प्रतिनिधी | अमळनेर : अमळनेर शहर व परिसरात बंद घरे फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोन आरोपींना अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. मध्यप्रदेशातील रहिवासी असलेल्या या आरोपींकडून तीन गुन्ह्यांतील सोन्या-चांदीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. गुन्हे शोध पथकाने गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ही कारवाई केली.
पोलीस अधीक्षक श्रीकांत डिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव परीमंडळ उपविभागीय पोलीस अधिकारी विनायकराव कोते आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास केला. गुन्हा क्र. ४४६/२०२६ (भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ)) मधील चोरीचा शोध घेत असताना, गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणातून आरोपी नवलसिंह बनसिंह अलावा (वय ३९, रा. काकडवा, ता. कुक्षी, जि. धार, मध्यप्रदेश) याची माहिती मिळाली. त्याला तांडा पोलीस स्टेशन हद्दीतून मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत नवलसिंहने साथीदार केरु उर्फ केहरु इंडिया डाबर (वय ४५, रा. बलेडी गलबेडा फलिया, ता. जोबट, जि. अलीराजपूर, मध्यप्रदेश) याच्यासह गुन्हे केल्याची कबुली दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने बलेडी गावात रवाना झाले आणि केरुला ताब्यात घेऊन अमळनेर पोलीस ठाण्यात आणले. चौकशीत त्यानेही गुन्ह्यांची कबुली देऊन चोरीचा माल काढून दिला.
आरोपींच्या कबुलीनुसार, ३१/०१/२०२६ रोजी रात्री ९ वाजता ते मोटारसायकलने अमळनेरला आले आणि शहराबाहेरील शेतात थांबले. रात्री १२ नंतर पायी चालत नदीजवळील कॉलनीतील बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरले. त्यानंतर ३/०४/२०२६ रोजी सिमेंट क्रॉंकीट रोडजवळील कॉलनीतील बंद घर फोडून दागिने चोरले. तर २४/०८/२०२६ रोजी रात्री १२ नंतर सिमेंट क्रॉंकीट रोडजवळील कॉलनीत बंद घरात शिरून लोखंडी कपाटातील १०,००० रुपये रोख (त्यात ५००/- च्या ५० नोटा) आणि देवघरातील चांदीची गणपतीची मूर्ती व लक्ष्मीचे नक्षीकाम केलेले गोल नाणे चोरले होते.
जप्त केलेला मुद्देमाल
-
गुन्हा क्र. ४४६/२०२६: ९० ग्रॅम वजनाची चांदीची गणपतीची मूर्ती आणि २० ग्रॅम वजनाचे चांदीचे लक्ष्मीचे गोल नाणे.
-
गुन्हा क्र. ३२/२०२६: ५ ग्रॅम सोन्याची गोळी, ५० ग्रॅम चांदीचा तुकडा आणि १४ ग्रॅम वजनाचे चांदीचे चार कडे.
-
गुन्हा क्र. १५९/२०२६: ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, १ ग्रॅम सोन्याची अंगठी, २३ ग्रॅम वजनाचे दोन चांदीचे करतोडे, २५ ग्रॅम चांदीचे दोन जोड वाडे आणि १८ ग्रॅम वजनाचे चांदीचे चार कडे.
हा सर्व मुद्देमाल जप्त करून सविस्तर पंचनामा करण्यात आला असून तो अमळनेर पोलीस ठाण्यात आणण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि शरद काकळीज करीत आहेत.
या कारवाईत गुन्हे शोध पथकातील पोउपनि शरद काकळीज, पोना सूर्यकांत साळुंखे, पोकॉ प्रशांत पाटील, उज्वल पाटील, नितीन मनोरे, उज्वलकुमार म्हस्के, नितीन कापडणे, तसेच जळगाव येथील स्था.गु.शा. चे पोकॉ गौरव पाटील आणि मिलींद जाधव यांनी सहभाग घेतला.
![]()

